Ratnagiri: भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, तळवडे वाकाडवाडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 13:14 IST2023-06-02T13:08:32+5:302023-06-02T13:14:41+5:30
बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

Ratnagiri: भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, तळवडे वाकाडवाडीतील घटना
राजापूर/पाचल : भक्ष्याचा पाठलाग करत विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप विहिरीबाहेर काढून वनविभागाने जीवदान दिले. राजापूर तालुक्यातील तळवडेपैकी वाकाडवाडी येथे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सुमारे सहा महिन्यांचा हा बिबट्या मादी जातीचा आहे, अशी माहिती रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी दिली आहे.
तळवडेपैकी वाकाडवाडी येथील ग्रामस्थ सीताराम तुकाराम चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती तलाठी अजित पाटील यांनी राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांना दिली. घाडगे यांनी रत्नागिरी वनक्षेत्रपाल यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पाहणी केली असता भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले.
या विहिरीला कठडा नाही तसेच विहीर जवळपास तीस फूट खोल असून घेरा पंधरा फूट आहे. विहिरीचा काठ ठिसूळ असून सतत माती व दगड पडत होते. विहिरीमध्ये बिबट्या व मांजर दिसले. मात्र, हे मांजर मृत होते. विहिरीत पिंजरा साेडून दुपारी १२:२५ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात यश आले.
लांजा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व चिपळूण सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूर वनपाल सदानंद घाडगे, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार, रत्नागिरीचे प्रभू साबने, राजापूरचे दीपक म्हादे यांनी सहभाग घेतला हाेता. तसेच विजय म्हादे, गणेश गुरव, प्रथमेश म्हादे, नीलेश म्हादे, तळवडे सरपंच गायत्री साळवी, पोलिस पाटील शीतल कोटकर, तंटामुक्त अध्यक्ष शिवराम कोटकर, महिला दक्षता कमिटी पोलिस स्थानकाच्या धनश्री मोरे, रायपाटण दूरक्षेत्राचे पोलिस हेडकाॅन्स्टेबल कमलाकर पाटील, सुजित पाटील, नितीन भानवसे, तसेच पत्रकार तुषार पाचलकर, सुरेश गुडेकर, दया सुतार व अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले.