नव्या बदलांमुळे शिवसेनेतील ‘नॉटरिचेबल’ नेते झाले ‘ॲक्टिव्ह’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:49 IST2022-07-23T18:46:58+5:302022-07-23T18:49:04+5:30
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटाला जवळ करताच जुने शिवसैनिक पुन्हा एकवटले

नव्या बदलांमुळे शिवसेनेतील ‘नॉटरिचेबल’ नेते झाले ‘ॲक्टिव्ह’
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : राज्यातील सत्तांतर बदलानंतर जिल्ह्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील जुने-नवे गट प्रकर्षाने समाेर आले असून, गेले अनेक महिने पक्षात असूनही ‘नाॅटरिचेबल’ झालेले पदाधिकारीही आता ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. माजी खासदार अनंत गीते, नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण) ॲड. सुजित कीर, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत ही मंडळी सक्रिय झाली आहेत.
लाेकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनंत गीते पक्षापासून दूर हाेते. काेणत्याही राजकीय व्यासपीठावर त्यांनी उपस्थिती लावली नव्हती. जिल्ह्याशी संपर्कही कमी करून त्यांनी केवळ सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली हाेती. मात्र, शिवसेनेत पडझड सुरू हाेताच अनंत गीते पुन्हा सक्रिय झाले आहेत. आमदार याेगेश कदम यांच्या मतदारसंघात त्यांनी सभा घेऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांची माेट बांधण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटाला जवळ करताच जुने शिवसैनिक पुन्हा एकवटले आहेत. सामंत समर्थक महेश म्हाप यांना उपजिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाश रसाळ यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिल्याने या पदावर सुजित कीर यांची वर्णी लावण्यात आली. गेले अनेक महिने सुजित कीर पक्षात असूनही पक्षापासून दूर हाेते. पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभागही नव्हता. आता पदावर नियुक्त करून त्यांना सक्रिय करून घेण्यात आले आहे.
तालुका युवा अधिकारी पदावरून तुषार साळवी यांना हटवून वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यांनी हे पद न स्वीकारल्याने शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. शहर संघटक म्हणून काम करताना त्यांनी शहरातील संघटनात्मक बांधणीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. आंदाेलन, माेर्चे यातील सहभागाव्यतिरिक्त शहरात अन्य ठाेस कार्यक्रमही राबवण्यात आलेले नाहीत. मात्र, आता त्यांच्यावर जबाबदारी साेपवून पक्षाने पुन्हा ‘ॲक्टिव्ह’ केले आहे.
नाराजीचा सूर
प्रसाद सावंत यांनी पक्षाला साेडून राष्ट्रवादीची वाट धरली हाेती. त्यानंतर सामंत यांच्यासाेबत ते स्वगृही परतले. संघटक म्हणून ते आपली छाप पाडू न शकताही त्यांना पद दिल्याने नाराजीचा सूर आहे.
शिवसेनेतील संघटन थांबले
शहर संघटक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरात नव्याने काेणतेच प्रवेश झालेले नाहीत. संघटना वाढीसाठी कार्यक्रमही राबवण्यात आलेले नाहीत. अन्य पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे कार्यक्रम हाेत असताना शिवसेनेतील संघटन मात्र थांबले हाेते.