Ratnagiri water shortage is critical even in the rain | पावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीर
पावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीर

ठळक मुद्देपावसातही रत्नागिरीतील पाणीटंचाई स्थिती गंभीरनगरसेवकांमध्ये असलेले हेवेदावे हेच पाणी पुरवठ्यातील अडसर

रत्नागिरी : जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक धरणे भरून वाहात आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ व पानवल धरणही भरून वाहात आहे. गेला महिनाभर मुसळधार पाऊस झाल्याने सर्व जलाशये भरली तरी रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला काही पुरेसे पाणी येत नसल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत.

आधीच जुनाट वितरण वाहिन्यांमुळे कमी दाबाने येणारे पाणी आणि त्यातच पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांची पाण्याच्या चाव्या उघडण्याबाबतची मनमानी व पाणी पुरवठ्यावरून काही प्रभागातील नगरसेवकांमध्ये असलेले हेवेदावे हेच रत्नागिरीच्या पाणी पुरवठ्यातील अडसर ठरत असल्याची चर्चा रत्नागिरीकरांमध्ये आहे.

रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्या गेल्या पाच वर्षांपूर्वीच बदलण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यासाठी नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांकडून ठोस प्रयत्न झाले नसल्याचा रत्नागिरीकरांचा आरोप आहे. शहरातील राजीवडा, शिवखोल, मिरकरवाडा तसेच अन्य भागांमध्येही नळपाणी योजनेला अल्पदाबाने अपुरे पाणी येते.

काही भागात काही दिवस पाणीच न येण्याचे प्रकार सुरू आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेकडून टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, त्यानेही शहरवासियांची पाण्याची गरज भागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरीतील पाणी टंचाईची स्थिती ही राजकीय अनास्थेमुळे असून २०१६ मध्ये मंजूर झालेली ६३ कोटींची सुधारित नळपाणी योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेचे काम पूर्ण होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

जुनाट वितरण वाहिन्यांमुळे टंचाईची स्थिती भर पावसाळ्यातही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या शहरातील अनेक भागात तीव्र टंचाई असून पाण्याविना नागरिक हतबल झाले आहेत. नवीन नळपाणी योजना कार्यान्वित होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार असल्याने रत्नागिरीकरांचे पाण्यावाचून हाल सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील राजीवडा भागातील टंचाई स्थिती गेल्या काही महिन्यांपासून गंभीर झाली आहे. नळपाणी योजनेच्या नळांना अल्प पाणी येते, तर कधी येतच नाही. त्यामुळे त्या ठिकाणी एका खासगी विहिरीचे पाणी साठवण टाकीत पंपाद्वारे लिफ्ट करून त्या परिसराला पुरविण्याची मागणी करण्यात आली होती. विहीर मालकाचीही त्याला सहमती होती. दोन महिन्यांपूर्वी त्यासाठी शिवखोल, राजीवडा येथे नगर परिषद अभियंत्यांनीही पाहणी केली. पंप देण्याचे आश्वासन मिळाले. आश्वासनाशिवाय राजीवडावासियांना काहीच मिळाले नाही.

शहराला दररोज शीळ व पानवल धरणातून सुमारे १५ ते १६ लाख लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हे पाणी गळतीमुळे शहरातील नळ जोडण्यांपर्यंत पूर्ण दाबाने पोहोचतच नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती शहरात असून सुधारित नळपाणी योजना पूर्ण होणार कधी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम पाणी सभापती सुहेल मुकादम हे प्रामाणिकपणे करीत आहेत. परंतु त्यांना पाणी विभागातील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. पाणी पुरवठ्याच्या चाव्या उघडण्याच्या वेळांमध्ये सावळागोंधळ आहे. नगरसेवकांमध्येही पुरवठ्यावरून वादावादी आहे. त्यामुळे कर्मचारीही त्रस्त असल्याची चर्चा आहे.


Web Title: Ratnagiri water shortage is critical even in the rain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.