रत्नागिरी : भरणेतील पतसंस्थेत चोरट्याचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:43 IST2018-12-18T17:42:09+5:302018-12-18T17:43:07+5:30
भरणे येथील श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची भरणे येथील शाखा फोडून तीन लाख ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीला आली.

रत्नागिरी : भरणेतील पतसंस्थेत चोरट्याचा डल्ला
खेड : भरणे येथील श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची भरणे येथील शाखा फोडून तीन लाख ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीला आली.
मुंबई - गोवा महामार्गावर भरणे येथे सुलोचना निवास इमारतीत असलेल्या श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत शनिवारी संध्याकाळी ६ ते सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली.
शाखा व्यवस्थापकांच्या दालनाला असलेल्या खिडकीची संरक्षक लोखंडी जाळी उचकटून खिडकीला असलेली स्लायडिंग सरकवून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. पतसंस्थेत जमा होणारी रोख रक्कम ठेवण्यासाठी कॅशियर केबिनमध्ये असलेली लोखंडी तिजोरी फोडून त्यात असलेली रोकड चोरट्यांनी लंपास केली.
याबाबतची फिर्याद पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र दत्ताराम मोरे (रा. भडगाव) यांनी खेड पोलीस स्थानकात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.