Ratnagiri: रत्नागिरीत टेम्पाे-दुचाकी अपघात; साखरतर येथील तरुण जागीच ठार
By मनोज मुळ्ये | Updated: September 10, 2023 15:52 IST2023-09-10T15:52:04+5:302023-09-10T15:52:25+5:30
Ratnagiri Accident News: मच्छीची वाहतूक करणाऱ्या टेम्पाेची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील परटवणे येथील चाैकात रविवारी (१० सप्टेंबर) दुपारी घडली. अपघातात मृत्यू झालेला तरुण साखरतर येथील असल्याचे समजते.

Ratnagiri: रत्नागिरीत टेम्पाे-दुचाकी अपघात; साखरतर येथील तरुण जागीच ठार
- मनाेज मुळ्ये
रत्नागिरी : मच्छीची वाहतूक करणाऱ्या टेम्पाेची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील परटवणे येथील चाैकात रविवारी (१० सप्टेंबर) दुपारी घडली. अपघातात मृत्यू झालेला तरुण साखरतर येथील असल्याचे समजते. अपघातानंतर साखरतर येथील ग्रामस्थांचा माेठ्या प्रमाणात जमाव जमला हाेता. कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
रत्नागिरीतील उद्यमनगर येथून दुचाकीस्वार साखरतर येथे जात हाेता. त्याचवेळी एमएच ०८ एपी ५६७७ हा मासळी वाहतूक करणारा टेम्पाे मिरकरवाडा येथून निघाला हाेता. परटवणे येथील चाैकात दाेन्ही वाहने समाेरासमाेर आली असता टेम्पाेची दुचाकीला जाेरदार धडक बसली. ही धडक इतकी भयानक हाेती की, दुचाकीचा चक्काचूर झाला. तर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू झालेला स्वार साखरतर येथील असल्याचे कळताच साखरतर येथील ग्रामस्थ माेठ्या संख्येने परटवणे येथे जमा झाले हाेते. टेम्पाे चालकावर तात्काळ कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला हाेता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यवाही सुरू केली. मात्र, या अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.