रत्नागिरी : चिपळुणात धावू लागला दुसरा टॅँकर, अजून एका टॅँकरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:48 IST2018-04-28T16:48:17+5:302018-04-28T16:48:17+5:30
गेले काही दिवस तालुक्यात एकाच टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनंतर दुसरा टँकरही धावू लागला आहे. त्यामुळे आता दोन टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील १३ गावांमधील ३० वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यात तहानलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लवकरच तिसरा टँकरही कार्यान्वित होणार आहे.

रत्नागिरी : चिपळुणात धावू लागला दुसरा टॅँकर, अजून एका टॅँकरची गरज
चिपळूण : गेले काही दिवस तालुक्यात एकाच टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनंतर दुसरा टँकरही धावू लागला आहे. त्यामुळे आता दोन टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील १३ गावांमधील ३० वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यात तहानलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लवकरच तिसरा टँकरही कार्यान्वित होणार आहे.
यावर्षी वाढत्या उष्म्यामुळे टंचाई आराखड्याबाहेरील गावांनाही पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत. गेले काही दिवस एकाच टँकरच्या माध्यमातून ९ गावांतील २१ वाड्यांना पाणीपुरवठा सुरु होता. चिपळूण तालुक्यासाठी ३ टँकर मंजूर असले तरी त्यावर चालक मिळत नसल्याने केवळ एकाच टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली होती.
आता तालुक्यात अलोरे जलसंपदा विभागाचा दुसरा टँकर धावू लागला आहे. त्यामुळे सध्या २ टँकरच्या माध्यमातून कोंडमळा -धनगरवाडी, टेरव - दत्तवाडी, धनगरवाडी, अडरे - धनगरवाडी, परशुराम - पायरवाडी, शिरवली, निवळी, गाणे - धनगरवाडी, तिवडी -भटवाडी, राळेवाडी, चोरगेवाडी, मधलीवाडी, उगवतावाडी, बौध्दवाडी, रिक्टोली - इंदापूरवाडी, देऊळवाडी, मधलीवाडी, खालचीवाडी, मावळतवाडी, बौध्दवाडी, भटवाडी, नांदिवसे - स्वयंदेव, कळंबट -घवाळवाडी, सुतारवाडी, धनगरवाडी, केतकी - बौध्दवाडी, कोसबी -डिगेवाडी, धनगरवाडी, निचोरेवाडी, गोताडवाडी या टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.