रत्नागिरीत फेब्रुवारीतच तापमानाचा पारा ३९ अंशांवर, आतापर्यंतचे उच्चांकी तापमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:22 IST2025-02-27T13:21:37+5:302025-02-27T13:22:58+5:30

एप्रिल-मे महिन्यांत उष्णतेचा भयंकर तडाखा सहन करावा लागणार असल्याची शक्यता

Ratnagiri recorded the highest ever temperature at 39 degrees Celsius in February itself | रत्नागिरीत फेब्रुवारीतच तापमानाचा पारा ३९ अंशांवर, आतापर्यंतचे उच्चांकी तापमान 

संग्रहित छाया

रत्नागिरी : दिवसेंदिवस रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात अधिकाधिक वाढ होऊ लागली आहे. दरवर्षी होळीनंतर साधारणत: मार्च महिन्यात तापमानवाढीला सुरुवात होते; पण यंदा २१ फेब्रुवारीपासूनच पारा वाढू लागला आहे. बुधवारी रत्नागिरीतील तापमानाची नोंद ३९ अंश सेल्सिअस इतकी झाली.

पहाटे गारवा आणि सकाळी साधारणत: ९ ते १० वाजल्यापासून उष्म्यात वाढ होऊ लागली आहे. दुपारी १२ ते सायंकाळी अगदी साडेचार वाजेपर्यंतचे तापमान असह्य होत आहे. रत्नागिरीतही आता दुपारच्या वेळेत वर्दळ कमी होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाचे चटके असह्य होऊ लागल्याने नागरिक दुपारी डोक्याला स्कार्फ गुंडाळून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

रत्नागिरीत २६ फेब्रुवारी २०१८ साली भारतीय हवामान विभागाने नोंदवलेले रत्नागिरीचे तापमान ३८ अंश सेल्सिअस हे या महिन्यातील उच्चांकी तापमान होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस एवढे कमाल आणि १९ ते २० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान असते. २०१८ नंतर आता सहा वर्षांनी यंदाच्या २६ फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या ३९ अंश सेल्सिअस तापमानाने २०१८ सालचा उच्चांकही मोडला आहे.

मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात २१ तारखेपासून वाढू लागलेल्या या तापमानामुळे आता एप्रिल-मे महिन्यांत उष्णतेचा भयंकर तडाखा सहन करावा लागणार असल्याची शक्यता दिसू लागली आहे.

२१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान असे होते तापमान

तारीख - तापमान कमाल - किमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२१ - ३८.९ - २१.५
२२ - ३८.४ - २१.९
२३ - ३५.६ - २१.३
२४ - ३८.९ - २१.३
२५ - ३७.० - २१.५

Web Title: Ratnagiri recorded the highest ever temperature at 39 degrees Celsius in February itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.