रत्नागिरी पाेलिसांनी नष्ट केला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा, ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन
By अरुण आडिवरेकर | Updated: December 28, 2024 18:22 IST2024-12-28T18:19:02+5:302024-12-28T18:22:34+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी पाेलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन ...

रत्नागिरी पाेलिसांनी नष्ट केला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा, ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन
रत्नागिरी : रत्नागिरी पाेलिसांनी गेल्या १४ वर्षात विविध १२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १०.०३३ किलाेग्रॅम गांजा आणि ३.९८ किलाेग्रॅम केटामाईन असा एकूण १४.०१३ किलाेग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केला आहे. नवी मुंबईतील तळाेजा येथे रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाेलिसांनी अंमली पदार्थ जाळून नष्ट केला.
पोलिस महासंचालकांकडून एन. डी. पी. एस अॅक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्याकरिता सर्व पोलिस अधीक्षकांना निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे आहेत.
सन २००६ ते सन २०२० या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण १२ एन. डी. पी. एस. कायद्यांतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन घेतले हाेते. हा मुद्देमाल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आला होता.
त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून हा मुद्देमाल नवी मुंबईतील तळाेजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. येथे नाश करण्याची मंजुरी दिली हाेती. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने शुक्रवारी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल १२ विविध गुन्ह्यातील १०.०३३ किलोग्राम गांजा व ३.९८ किलोग्राम केटामाईन असा मुद्देमाल जाळून नष्ट केला.