रत्नागिरी पंचायत समितीची सभा गाजली अनुपस्थित अधिकाऱ्यांमुळे , सभेत खडाजंगी, तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:30 IST2018-08-21T16:27:30+5:302018-08-21T16:30:30+5:30
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़

रत्नागिरी पंचायत समितीची सभा गाजली अनुपस्थित अधिकाऱ्यांमुळे , सभेत खडाजंगी, तीव्र संताप
रत्नागिरी : अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़
या सभेमध्ये सुरुवातीला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, केरळमध्ये वादळाने मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ सभेच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ सार्वजनिक बांधकाम खाते, शिक्षण विभाग, तालुका कृषी विभाग, महावितरण आदींचे अधिकारी सभेला अनुपस्थित होते़ त्यामुळे सभा तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली़. त्यासाठी काही वेळ सभेचे कामकाजही सदस्यांनी थांबविले होते़ .
त्यावेळी उपसभापती सोनवडकर यांनी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून याबाबत चर्चा करण्यात येईल़ सभेचे कामकाज सुरु ठेवा, अशी विनंती सदस्यांनी केली़ त्यावेळी सदस्यांनी त्यांच्या विनंतीला मान देत सभा पुढे सुरु ठेवली़ यावेळी उशिरा आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सभापती विभांजली पाटील यांनी चांगलेच फैलावर घेतले़ त्यांनी यापुढे कारण सांगून चालणार नाही, अशा शब्दात सुनावले़
जिओ कंपनीकडून ग्रामीण भागामध्ये जमीनीची खोदाई करुन केबल टाकण्याचे काम सुरु आहे़ याबाबत बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांसमोर प्रश्न उपस्थित करुन त्यांना तात्काळ काम बंद करण्याचे नोटीस देण्यात यावी़ त्याचबरोबर त्यांच्याकडून काम सुरु करण्यापूर्वी अनामत रक्कम घ्यावी, अशा सूचना सदस्य गजानन पाटील यांनी दिली़ त्याचबरोबर केबलच्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन जिवितहानी होण्याची भिती सदस्यांनी व्यक्त केली़
यावेळी सदस्या साक्षी रावणंग यांनी १७ शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत़ त्यातील विद्यार्थ्यांची अन्य शाळेमध्ये सोय करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला़ मात्र, हे करताना काही विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो़ त्याचबरोबर नाखरे उंबरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याने तेथील विद्यार्थीही शाळेत जात नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़
यावेळी सदस्य गजानन पाटील, अभय खेडेकर, ऋषिकेश भोंगले, दत्तात्रय मयेकर, सदस्या मेघना पाष्टे, संजना माने, रिहाना साखरकर, स्रेहा चव्हाण, साक्षी रावणंग व अन्य उपस्थित होते़
निषेधाचा ठराव
दिल्लीतील जंतरमंतर येथे समाजकंटकांकडून राज्यघटनेची प्रत जाळण्यात आली़ तसेच भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही अपशब्द वापरण्यात आले़ याबद्दल सदस्या साक्षी रावणंग यांनी सभागृहामध्ये निषेधाचा ठराव मांडला़ त्याला पंचायत समितीच्या सभागृहाने मंजुरी दिली़