रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, सोडले नैसर्गिक अधिवासात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:35 IST2018-03-17T12:35:23+5:302018-03-17T12:35:23+5:30
संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असताना गुरूवारी सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत कोसळल्याची घटना वायंगणे - नवेलेवाडी येथे घडली. ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश मिळवले. सायंकाळी या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, सोडले नैसर्गिक अधिवासात
देवरूख : संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असताना सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत कोसळल्याची घटना वायंगणे - नवेलेवाडी येथे घडली. ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश मिळवले. सायंकाळी या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
वायंगणे नवेलेवाडी येथे गुरूवारी रात्री सावजाचा पाठ करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. येथील ग्रामस्थ विठ्ठल बाळू नवेले हे शुक्रवारी सकाळी पाणी भरण्यासाठी गेले असता, विहिरीत बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. ही बाब गावात पसरताच ग्रामस्थांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली.सरपंच सुरेश घडशी यांनी ही माहिती वन विभागाला दिली.
वन विभागाचे वनरक्षक एल. बी. गुरव, सागर गोसावी, डी. आर. कोळेकर, डी. व्ही. आरेकर, एन. एस. गावडे, विक्रम कुंभार, राहुल गुंठे हे पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले. बिबट्याला वर काढताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. फिरते पथक चिपळूणचे वनक्षेत्रपाल शहाजी पाटील, निलख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बिबट्या सुमारे २ वर्षे वयाचा होता. शुक्रवारी सायंकाळी या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.