रत्नागिरी : लाल रंगाची उधळण करत संगमेश्वरवासिय रंगात न्हाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:46 IST2018-03-17T12:46:32+5:302018-03-17T12:46:32+5:30
संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरीचा प्रसाद देऊन साजरा केला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फेऱ्याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊन निघाले होते.

शिंपणे उत्सवामुळे संपूर्ण रस्ताच लाल रंगाने न्हाऊन गेला होता.
देवरूख : संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व भाकरीचा प्रसाद देऊन साजरा केला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फेऱ्याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊन निघाले होते.
दुपारपासून गणपती मंदिर येथून फेऱ्याला सुरूवात झाली. फेऱ्यामध्ये बैलगाड्यांमधून रंगांची उधळण करण्यात आली. या उत्सवात वापरण्यात येणारा रंग लाल असतो. लाल रंगाची उधळण हेच कसबा येथील रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य असून, हा लाल रंग विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे.
या उत्सवावेळी जाखमातेचा जयजयकार करत लाल रंग एकमेकांवर उडवत शिंपणे साजरे करण्यात आले. या उत्सवाप्रसंगी नवसाचे बलिदान दिले जाते. यानुसार शिंपणे उत्सवाच्या दिवशीही नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडला.
मुंबई - गोवा महामार्गालगतच हा उत्सव पार पडला. भाविकाला भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जाखमातेच्या दर्शनाचा लाभ संगमेश्वरच्या माहेरवाशिणी पतीसोबत घेतानाचे चित्र पाहावयास मिळाले. या उत्सवासाठी नवविवाहीत महिला पतीसह खास आदल्या दिवशी कसबा संगमेश्वर येथे देवी जाखमातेचे दर्शन घेऊन देवीला फळे वाहतात.
घरातील लहान मुलांनी जावयाला रंगवण्याची पध्दत संगमेश्वरमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. ही प्रथा आजही पहायला मिळते. या उत्सवामध्ये केवळ पुरूषच नव्हे; तर स्त्रियादेखील तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. कसबा येथील या मंदिराच्या शेजारी रंगांची तळी उभारली जातात. ही तळी या उत्सवाच्या दिवशी फोडतात, याला लेंडी फोडणे असे म्हणतात.
याप्रमाणे लेंडी फोडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी प्रतिवर्षाप्रमाणे आनंदात पार पडला. संगमेश्वर शहराला सायंकाळी फेरा मारून जाखमातेच्या मंदिराजवळ या उत्सवाची सांगता करण्यात आली. मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला याहीवर्षी भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान या उत्सवावेळी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रसादाचा आस्वाद
संगमेश्वर तालुक्यातील जाखमातेचा शिंपणे उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. उत्सवाची महती दरवर्षी वाढतच असल्याचे दिसत आहे. या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे या उत्सवादरम्यान काजूयुक्त - वडे आणि भाकरी असा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शेकडो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेऊन लाल रंगाच्या उधळणीमध्ये स्वत:ला रंगवून घेतले होते. या शिंपणे उत्सवामुळे संपूर्ण रस्ताच लाल रंगाने न्हाऊन गेला होता.