Coronavirus in Maharashtra रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी वाढले २६ रूग्ण, सहावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 09:54 IST2020-05-31T09:52:54+5:302020-05-31T09:54:29+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मुंबईतून आलेल्या एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होता. तो रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील एका गावामध्ये १५ दिवसांपूर्वी आला होता़ त्याला गावाच्या जवळच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.

Coronavirus in Maharashtra रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी वाढले २६ रूग्ण, सहावा बळी
रत्नागिरी : शनिवारची पहाट रत्नागिरी जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरली. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये तब्बल २६ रूग्णांची भर पडली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २३४ झाली आहे. मुंबईहून आलेल्या आणखी एका कोरोनाबाधित ४९ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ हा जिल्ह्यातील सहावा बळी ठरला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २०८ होती. त्यामध्ये आणखी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २३४ झाली आहे़ त्यामध्ये चिपळूणातील कामथे रुग्णालयातील १२, राजापूरमधील ४, रत्नागिरीतील ६, खेड कळंबणी रुग्णालयातील ३ आणि संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मुंबईतून आलेल्या एका ४९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होता. तो रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील एका गावामध्ये १५ दिवसांपूर्वी आला होता़ त्याला गावाच्या जवळच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला दम्याचा आजार होता़ तो मुंबईतील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच शनिवारी त्याचे निधन झाले. कोरोनाबाधित रुग्णाचा अंतिम संस्कार रत्नागिरी करण्यात करण्यावरुन काही जणांनी जोरदार विरोध केल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर रत्नागिरी शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात त्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले़