रत्नागिरी समुद्रात धोक्याचा बावटा
By Admin | Updated: July 3, 2016 23:38 IST2016-07-03T23:38:56+5:302016-07-03T23:38:56+5:30
मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना : मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी समुद्रात धोक्याचा बावटा
रत्नागिरी : संततधार पडणाऱ्या वादळी पावसामुळे रत्नागिरीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जागोजागी पाणी भरून सर्व जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे, तर पुढच्या चोवीस तासात किनारपट्टीवरील मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. कोकण व गोवा याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे.
गेले दहा दिवस पावसाने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये थैमान घातले असून, जिल्ह्यातील काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार सुरूवात केली आहे. गेले आठ दिवस पावसाने रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. दमदार पडणाऱ्या या पावसामुळे जागोजागी पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. जनजीवन विस्कळीत झाले असून, पडझडीचे प्रमाणही दिवसेदिवस वाढत आहे. शनिवारी रात्री हातिवले व राजापूर तालुक्याला च्रकीवादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, घरे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या पावसाचा आवेश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मासेमारी बंदीचा काळ असतानाही छोट्या - मोठ्या बोटी सुमद्रात मासेमारी करताना दिसत असतात. त्यात नैऋत्य वारे जोरदार वाहण्याची शक्यता असून, समुद्रकिनारपट्टी व मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून हा इशारा देण्यात आला आहे. येत्या चोवीस तासात नैऋत्य दिशेने ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकाळात समुद्र अतिशय खवळलेला असतो. त्यामुळे रत्नागिरी समुद्रकिनारी बंदर विभाग, रत्नागिरी यांच्याकडून तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून, मच्छीमारांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)
आज दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात ६५९ मिलिमीटर पावसांची नोंद झाली असून, सर्वाधिक १०८ मिलिमीटर पाऊस संगमेश्वरमध्ये झाला आहे. मंडणगडमध्ये ७५ मिलिमीटर, दापोली ५२, खेड ९८, गुहागर ३६, चिपळूण १०५, रत्नागिरी २७, लांजा १०५ आणि राजापूरमध्ये ५३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.