रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांना नवीन गणवेशाचे शनिवारी आमदारांच्या हस्ते वाटप, चार हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:10 IST2018-01-05T13:00:54+5:302018-01-05T13:10:19+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थापनेपासून गेली ६९ वर्षे एस. टी. कर्मचाऱ्यांचा एक सारखा असलेला गणवेश आता बदलणार आहे. रत्नागिरी विभागातील सुमारे चार हजार कामगारांना नवीन गणवेश देण्यात येणार आहे. आमदार उदय सामंत यांच्याहस्ते ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता गणवेशाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांना नवीन गणवेशाचे शनिवारी आमदारांच्या हस्ते वाटप, चार हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थापनेपासून गेली ६९ वर्षे एस. टी. कर्मचाऱ्यांचा एक सारखा असलेला गणवेश आता बदलणार आहे. रत्नागिरी विभागातील सुमारे चार हजार कामगारांना नवीन गणवेश देण्यात येणार आहे. आमदार उदय सामंत यांच्याहस्ते ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता गणवेशाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमांतर्गत ९० कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नवीन गणवेशाचे वितरण केले जाणार आहे. चालक - वाहकांचा गणवेश खाकी रंगाचा, तर यांत्रिकी विभागातील कामगारांचा गणवेश निळ्या रंगाचा आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थापनेपासून दोनच रंगांचे गणवेश आहेत. महामंडळाने कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश देण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे वितरण राज्यात सर्वत्र सुरू झाले आहे.
वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेला नवीन गणवेशाचे डिझाईन तयार करण्यास सांगितले होते. कामाच्या ठिकाणचे हवामान व कामाचे स्वरूप याचा विचार करून नवीन गणवेश दिला जाणार आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून दोन वेळा गणवेश देण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक बारटक्के यांनी सांगितले. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, शिवशाही, शिवनेरी अशा गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
महिला कर्मचाऱ्यांना साडी आणि सलवार कमीज असा गणवेश देण्यात येणार आहे. चालक - वाहकांसह वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक नियंत्रक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, प्रमुख कारागीर, कारागीर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, यांत्रिकी कर्मचारी यांना नवीन गणवेश मिळणार आहे.