Ratnagiri: श्वानाच्या मागे धावला अन् बिबट्या बाथरूमात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:29 IST2025-08-26T17:28:35+5:302025-08-26T17:29:33+5:30
बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यामध्ये घेतले. त्यानंतर कुत्राही सुरक्षित बाथरूममधून बाहेर आला.

Ratnagiri: श्वानाच्या मागे धावला अन् बिबट्या बाथरूमात अडकला
देवरुख : श्वानाचा पाठलाग करण्याच्या नादात बिबट्या बाथरूममध्ये शिरला आणि अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द गावनवाडी येथे सोमवार २५ रोजी पहाटे घडली आहे. तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये हा प्रकार घडला.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश भालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस सोमवारी पहाटे साडेचार वाजता श्वानाचा पाठलाग करताना बिबट्या बाथरूममध्ये अडकला. ही माहिती कुंभारखाणी खुर्दचे पोलिस पाटील रवींद्र महाडिक यांनी वन विभागाला दिली. वनपाल यांनी घटनास्थळी जाऊन जाऊन खात्री केली. यावेळी बाथरूममध्ये कुत्रा व बिबट अडकला असल्याचे दिसले. यावेळी वन विभागाने बाथरूमच्या दरवाजावरील बाजू लाकडी फळ्या लावून बंद केली आणि दारासमोर पिंजरा लावला. बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यामध्ये घेतले. त्यानंतर कुत्राही सुरक्षित बाथरूममधून बाहेर आला.
या बिबट्याची कडवईचे पशुधन विकास अधिकारी सूर्यकांत बेलुरे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. हा बिबट नर असून, वय आठ ते नऊ वर्षांचा आहे. त्याची पूर्ण वाढ झाली असून, तो तंदुरुस्त असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
यावेळी घटनास्थळी रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, संगमेश्वर देवरुखचे न्हानू गावडे, वनरक्षक फुणगूस आकाश कडूकर वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली सुरज तेली, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, पोलिस पाटील रवींद्र महाडिक व ग्रामस्थ उपस्थित होते. विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी चिपळूण) गिरिजा देसाई तसेच सहायक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.