राजेंद्र माने महाविद्यालयाच्या टीम एमएच ०८ रेसिंग कारची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 13:37 IST2020-02-18T13:36:12+5:302020-02-18T13:37:37+5:30
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने इंजिनीरिंग महाविद्यालयातील टीम एमएच ०८ रेसिंगने यावर्षी देखील फॉर्म्युला भारत २०२० या कोइमतूर तामिळनाडू येथे पार पडलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे. एमएच ०८ रेसिंग टीम ही कोकणातील एकमेव फॉम्युर्ला स्टूडंट टीम आहे. २०१५ पासून कार्यरत असणारी ही टीम दरवर्षी या महाविद्यालयाची तसेच संपूर्ण कोकणाची कीर्ती वाढविण्यात सफल होत आहे.

राजेंद्र माने महाविद्यालयाच्या टीम एमएच ०८ रेसिंग कारची धूम
देवरूख : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने इंजिनीरिंग महाविद्यालयातील टीम एमएच ०८ रेसिंगने यावर्षी देखील फॉर्म्युला भारत २०२० या कोइमतूर तामिळनाडू येथे पार पडलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे. एमएच ०८ रेसिंग टीम ही कोकणातील एकमेव फॉम्युर्ला स्टूडंट टीम आहे. २०१५ पासून कार्यरत असणारी ही टीम दरवर्षी या महाविद्यालयाची तसेच संपूर्ण कोकणाची कीर्ती वाढविण्यात सफल होत आहे.
फॉर्म्युला भारत २०२० या स्पर्धेत टीम एमएच ०८ रेसिंगने महालक्ष्मी-४ ही त्यांची आंतरराष्ट्रीय दर्जाची कार प्रदर्शित केली. या स्पर्धेत कमीत कमी वेळात तांत्रिक चाचणी पार केल्यानंतर टीम ने डीझाईन प्रेझेन्टेशन, कॉस्ट प्रेझेन्टेशन, बिझिनेस प्रेझेन्टेशन अशा इव्हेंटमध्ये आपली कामगिरी सिद्ध केली. या इव्हेंट मधील उत्तम सादरीकरण व रेस कारच्या उत्कृष्ट डीझाईन च्या आधारे टीम ने डीझाईन मध्ये १५वा, कॉस्ट मध्ये २८ वा तर बिझिनेस मध्ये २६ वा क्रमांक प्राप्त केला.
टीमच्या या स्पर्धेतील सार्वत्रिक कामगिरीमुळे देशातील ७५ टीममधून २७वा राष्ट्रीय दर्जा प्राप्त केला. राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय व कोकणासाठी ही अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. फॉर्म्युला भारत २०२० ही फॉम्युर्ला स्टूडंट जगातील प्रतिष्ठीत अशी स्पर्धा मानली जाते.
विद्यार्थ्यांच्या अचूक निर्णय क्षमता, धाडस, जिद्द, चिकाटी, या गुणांच्या जोरावर ही टीम दरवर्षी नवीन कार निर्माण करत आहे. प्रत्येक कार ही पूर्वीच्या कारपेक्षा अधिक श्रेष्ठ व अत्याधुनिक निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय आहे. यामध्ये आधुनिक अभियांत्रिकी सरावांचा समावेश असतो.