Ratnagiri: राजापूर, लांजा शहरही होणार स्मार्ट, २५० कोटींचा प्रस्ताव तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:44 IST2025-01-30T17:44:17+5:302025-01-30T17:44:57+5:30
आमदार किरण सामंत यांनी घेतला पुढाकार

Ratnagiri: राजापूर, लांजा शहरही होणार स्मार्ट, २५० कोटींचा प्रस्ताव तयार
राजापूर : राजापूर आणि लांजा या दोन्ही शहरासांठी आमदार किरण सामंत यांनी प्रत्येकी अडीचशे कोटींच्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावांतर्गत अन्य सुविधांसोबत केवळ मुख्यच नव्हे तर शहरातील जोडरस्तेही काँक्रीटचे होणार आहेत.
तालुक्यातील अनेक प्रश्नांवर आमदार सामंत यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पायाभूत विकासावर अधिक भर दिला आहे. या दोन्ही शहरांच्या प्राथमिक विकासाच्या दृष्टीने केवळ मुख्य रस्ताच नव्हे तर शहराला जोडणारे व अंतर्गत रस्तेही काँक्रीटचे व्हावे यावर त्यांचा भर आहे. डांबरी रस्ते अतिवृष्टीने वाहून जात असल्याने रत्नागिरी शहराच्या धर्तीवर हे रस्ते काँक्रीटचेच व्हावे यासाठी त्यांचा आग्रह आहे.
यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद शासनाकडून करवून घेण्यासाठी आपण बांधील आहोत. या मतदारसंघात होणार कोणताही विकास दीर्घकाळासाठीचा असावा, असे आपले मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.