राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:59 IST2019-04-26T16:57:11+5:302019-04-26T16:59:13+5:30
राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.

राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईने १६० दिवसांनी पुन्हा भाविकांना दर्शन दिले.
राजापूर : राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.
मागील वेळी ७ जुलै २०१८ ला गंगेचे आगमन झाले होते व १५ नोव्हेंबर २०१८ ला ती अंतर्धान पावली होती. जवळपास शंभराहून अधिक दिवस तिचे वास्तव होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तव्याला असायची व नंतर ती अंतर्धान पावत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात बदल झाला असल्याचे पहावयास मिळाले. या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पहावयास मिळाले होते.
गतवेळी १५ नोव्हेंबरला गंगा अंतर्धान पावल्यानंतर सुमारे १६० दिवसांनंतर ती गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान पुन्हा अवतीर्ण झाली. गंगेच्या पुजेसाठी दररोज जाणारे राहुल काळे हे पुजारी गुरुवारी तेथे गेले असता गंगा आल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यानंतर काळे यांनी गंगापुत्रांसहीत इतरत्र याची माहिती दिली.
राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव
गंगा आल्याचे वृत्त क्षेत्राच्या आजूबाजूला पसरताच अनेकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. त्यावेळी मुख्य असलेल्या काशीकुंडासहीत अन्य कुंडे तुडुंब पाण्याने भरली होती तर काशीकुंडाच्याच बाजूला असलेल्या गोमुखातून पाणी वाहत होते. गंगेचे आगमन झाल्यानंतर गुरुवारी दिवसभर भाविकांची गंगाक्षेत्रावर रिघ सुरू होती.
राजापूर शहराच्या पुरातन ओळख सांगणाऱ्या ठळक बाबींमध्ये गंगेचा उल्लेख कायम केला जातो. दर तीन वर्षांनी अवतीर्ण होणारी गंगा इतिहास काळापासून प्रचलित आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, काशीचे सुप्रसिद्ध गागाभट्ट, कवी मोरोपंत यांनी राजापूरच्या गंगाक्षेत्राला भेट दिल्याची माहिती इतिहासातून मिळते.
या गंगेचा संबंध काशी या क्षेत्राशी पूर्वापार जोडला जातो. या गंगेच्या आगमनाबाबत पूर्वापार कथा प्रचलित आहे. मागील काही वर्षांमध्ये तिच्या आगमन व गमन या नियमिततेमध्ये बदल झाला असून त्यामुळे दर तीन वर्षांनी या तिच्या आगमन काळाला छेद गेला आहे. यापूर्वी सन २००४ साली गंगेचा धुतपापेश्वरशी विवाह सोहळा पार पडला होता.