रत्नागिरी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी (६ ऑगस्ट) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली हाेती. पावसाने विश्रांती घेतल्याने सायंकाळी नागरिकांनी सुटीचा आनंद लुटला. ग्रामीण भागातील शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २३३३.५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २८१.६२ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी त्यानंतर सातत्याने काेसळत राहिल्याने कमी कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे लागवडीची कामे बऱ्यापैकी आटोपली आहेत. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात ३१ मिलिमीटर इतका पडला आहे. सर्वात कमी पाऊस राजापूर तालुक्यात एक मिलिमीटर इतका पडला आहे.तसेच आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात २,८९८ मिलिमीटर इतका पडला आहे. सर्वात कमी पावसाची नाेंद रत्नागिरी तालुक्यात १६९७ मिलिमीटर इतकी झाली आहे. जिल्ह्यात कुठेही पडझड किंवा नुकसानाची नोंद झालेली नाही. मासेमारीवरील निर्बंध हटविल्याने सध्या मासेमारी सुरू झाली असून, मच्छीमार खोल समुद्रात न जाता किनाऱ्यालगत काही अंतरावर मासेमारी करत आहेत.
रत्नागिरीत पावसाची उघडीप, शेतीची कामे अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:27 IST