रत्नागिरी/सिधुदुर्ग : रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी कहर केला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मुख्य नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी चिपळूण आणि राजापूर शहरात शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडनदी, वाघोटन नदी, शुकनदी, भंगसाळ नदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पुराचे, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.पावसाने सोमवारी दिवसभर संततधार धरल्याने खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली हाेती. तर चिपळूणमधील वाशिष्ठी संगमेश्वरमधील शास्त्री आणि बावनदी, लांजातील काजळी आणि मुखकुंदी, राजापूरमधील कोदवली या मुख्य नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे पाणी घुसल्याने पाच कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जुवाड बेटावरील नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.लांजा, राजापूरमध्ये पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राजापुरातील अर्जुना आणि काेदवली नद्यांचे पाणी वाढल्याने पुराचे पाणी शहरातील जवाहर चाैकापर्यंत आले हाेते. तसेच अणुस्कुरा घाटात सकाळी दरड काेसळून वाहतूक ठप्प झाली हाेती. ही दरड बाजूला केल्यानंतर तासाभरातच वाहतूक सुरू झाली. लांजा तालुक्यातील कडूगाव येथील दत्तमंदिराला पाण्याचा वेढा पडला हाेता.दापोली तालुक्यातही पावसाचा जोर होता. दरम्यान, खेड-दापोली रस्त्यावर पाणी आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील दख्खन येथे कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम मंगळवारीही सुरू होते. मात्र, एका बाजूने वाहतूक सुरू होती.रत्नागिरी तालुक्यात चांदेराई पुलाजवळील काजळी नदीचे पाणी ओसरले आहे; परंतु चांदेराई व हरचिरीमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने या गावातील वाहतूक बंद करून पुलावरील वाहतूक कुरतडे मार्गे सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:38 IST