रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथे बुधवारी (दि. ७) पहाटे तीन वाजता झालेल्या वादळी वारे, पावसामुळे झाडे घरावर पडल्यामुळे घरांचे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेले. आरेवारे येथील सुरूची झाडे उन्मळून पडली. पहाटे वादळ वाऱ्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ग्रामस्थ गाढ झोपेत असताना अचानक विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वाऱ्याला वेग होता, शिवाय बराच वेळ वारा सुरू असल्याने नारळाच्या झावळा तुटून पडल्या. नारळही पडले. आंब्याच्या झाडाच्या फांद्या तुटल्या, शिवाय आंबाही जमिनीवर कोसळला. आधीच आंबा कमी त्यात वादळामुळे तोही पडल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.काजीरभाटी येथे घरावर नारळाचे झाड कोसळल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही घरांवर आंब्याचे झाडही कोसळून नुकसान झाले. ढोकमळे येथील नीलेश मोरे यांच्या घरावरील पत्रे उडाले. वाऱ्याच्या वेगामुळे आसपासच्या परिसरात जाऊन पडल्याने पत्र्यांचा भुगा झाला. त्यामुळे मोरे यांच्या घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आरेवारे येथे सुरूची झाडे माेठ्या प्रमाणावर कोसळून रस्त्यावर पडली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरील झाडे बाजूला केल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती.
वादळी वाऱ्यामुळे नेवरे व आसपासच्या गावातील वीजपुरवठा पहाटे तीन वाजल्यापासून खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांची पुरती झोपमोड झाली. तब्बल दहा तासांनी दुपारी एक वाजताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांचे सकाळी पाण्याशिवाय चांगलेच हाल झाले.