दहा वर्षांतील आमूलाग्र बदल जनतेपर्यंत पाेहाेचवा : रवींद्र चव्हाण
By अरुण आडिवरेकर | Updated: April 14, 2024 16:44 IST2024-04-14T16:44:14+5:302024-04-14T16:44:23+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा रविवारी पार पडला.

दहा वर्षांतील आमूलाग्र बदल जनतेपर्यंत पाेहाेचवा : रवींद्र चव्हाण
खेड : तळागाळातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शासकीय योजना, शासकीय योजनांचे लाभार्थी तसेच भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे यासह आरोग्य, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रांत गेल्या दहा वर्षांतील झालेला आमूलाग्र बदल या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खेड येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा खेड शहरातील पाटीदार भवन येथे रविवारी पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक बांधवाची कुटुंबप्रमुखासारखी काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी माजी खासदार अनंत गीते यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे कुणाच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ते पाहावे. त्यांच्या या राजकारणाला कंटाळून ४० आमदार बाहेर पडले. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत; पण उद्धव ठाकरे सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकले, असे मधुकर चव्हाण म्हणाले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अतुल काळसेकर, माजी आमदार विनय नातू, सूर्यकांत दळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, विनोद चाळके, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.