‘रत्नागिरी-आठ’ भाताची महाराष्ट्रासह सहा राज्यांना लागली गोडी, वाढत्या मागणीमुळे बियाण्याचे उत्पादन तिप्पट
By मेहरून नाकाडे | Updated: March 28, 2025 14:32 IST2025-03-28T14:32:20+5:302025-03-28T14:32:20+5:30
मेहरून नाकाडे रत्नागिरी : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या ‘ रत्नागिरी -आठ’ (सुवर्णा मसुरा) या ...

‘रत्नागिरी-आठ’ भाताची महाराष्ट्रासह सहा राज्यांना लागली गोडी, वाढत्या मागणीमुळे बियाण्याचे उत्पादन तिप्पट
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी -आठ’ (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. या वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यावर्षी गतवर्षीपेक्षा तिप्पट १९२ टन बियाणे वितरणासाठी तयार केले आहे.
कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील भात संशोधन केंद्राने २०१९ साली ‘रत्नागिरी आठ’ हे वाण विकसित केले. देशातील काही खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने बियाणे तयार करून विक्री करत आहेत. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या चार वर्षात या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातूनही पसंती मिळत आहे.
बदलत्या हवामानात टिकणारे ‘रत्नागिरी-आठ’ हे वाण असून, उशिरा पडणाऱ्या पावसाचा फटकाही बसत नाही. रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्येही या बियाणांची लागवड करता येते. गतवर्षी शिरगाव कृषी संशोधन केंद्र, वेंगुर्ला केंद्रावरून ६० टन भात उपलब्ध करून दिले होते. यावर्षीही शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीमुळे १९२ टन बियाणे तयार करण्यात आले आहे.
चांगली उत्पादकता
‘रत्नागिरी-आठ’ या वाणाच्या एक हजार दाण्याचे वजन १६ ते १७ ग्रॅम आहे. या जातीचे विद्यापीठस्तरावर उत्पन्न प्रतिहेक्टर ५५ ते ६० क्विंटल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टर ८५ ते ९० क्विंटल उत्पन्न घेतले आहे.
कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी
‘सुवर्णा’ या जातीला पर्याय म्हणून ‘रत्नागिरी-आठ’ हे वाण विकसित केले गेले आहे. १३५ ते १४० दिवसांत हे वाण तयार होते. कापणी वेळेत केल्यास तांदूळ तुटीचे प्रमाण कमी येते. मध्यम उंची असल्याने भात जमिनीवर लोळत नाही. तसेच कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
वैशिष्ट्ये
- पिकाचा कालावधी - १३५ ते १४० दिवस
- दाण्याचा प्रकार - मध्यम बारीक
- सरासरी उंची - १०० ते ११० सेंटिमीटर
- सरासरी उत्पादन - ५५ ते ६० क्विंटल
- करपा, कडाकरपा रोगास प्रतिकारक