प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचा
By Admin | Updated: October 16, 2014 00:06 IST2014-10-15T22:14:44+5:302014-10-16T00:06:10+5:30
तंटामुक्त समिती : प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी

प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचा
मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी -केवळ तंटे मिटविणे एवढेच तंटामुक्त समित्यांचे काम नसून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे समित्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. ग्रामीण पातळीवर अंतर्गत संघर्ष वाढत जाऊन पुढे त्याचे रूपांतर तंट्यात होते. एकूणच वातावरण गढूळ होते. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी समित्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी धडपड सुरू असलेली दिसून येत आहे.
अंतर्गत वाद झालेल्या मंडळीना एकत्र आणायचे, त्यांना वादापासून परावृत्त करायचे, म्हणजेच वादाचा प्रसंग टळतो. गढूळता निवळते.परिणमी पोलीस प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होतो. अशी शासनाची धारणा आहे. त्या कृतीला अनेक तंटामुक्त समित्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहेत. त्यामुळेच तंटामुक्त समित्यांना यश मिळत आहे. विविध प्रकारच्या तंट्यांमुळे गावातील शांतता भंग होते. एकमेकांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल केले जातात. तसेच जमिनीच्या तुकड्यावरून भावभावात होणारे वाद विकोपाला जाऊन वर्षानुवर्षे ही प्रकरणे न्यायालयात पडून राहतात. त्यामुळे कुटुंबातील, पिढ्यांमधील तेढ सुटण्याऐवजी वाढत जाते. आज अनेक कुटुंबातून असे कलह सुरू आहेत. त्यामुळे संबंधित बाबींचा विचार करून शासनाने कुठल्याही मुद्द्यावर वाद होण्यापूर्वीच दोन्ही पक्षकारांना एकत्र आणून त्यांच्यातील संघर्ष मिटविण्याचे अधिकार तंटामुक्त समित्यांना दिले आहेत.
तंटामुक्त समित्यांनी कुठेही वाद आढळून आला, तर वाद घालणाऱ्यांना तत्काळ भेटायचे. वाद-विवादाचे परिणाम काय? पैसा व वेळेचा कसा अपव्यय होतो? न्याय केव्हा मिळतो? याबाबत सविस्तर माहिती संबंधितांना देऊन संघर्ष दूर करण्याचे काम या समित्यांकडे आहे. वादाचे गुन्ह्यात रूपांतर होणार नाही, याची काळजी घ्यायची. झाल्यास तो मिटवायचा. जेणेकरून नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्यांचे प्रमाण रोखता येईल, अशी शासनाची धारणा आहे. ठिकठिकाणच्या तंटामुक्त समित्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत विशेष प्रयत्न केल्यामुळे हे यश मिळाले आहे. त्यामुळे तंट्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. तंटामुक्त अभियानात प्रतिबंधात्मक उपायाचे दहा प्रकार सांगण्यात आले आहेत. त्यामधील प्रत्येक घटकानुसार गावातील तंटामुक्त समित्यांनी कामकाज करायचे व वाद होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायची. प्रत्येक तंटामुक्त समितीने त्याअंतर्गत कसे काम केले, त्याचे मूल्यांकन समित्यांकडून केले जाते. त्यासाठी एकूण ८० गुण ठेवलेले असतात. तंटामुक्त अभियान राबविणारी गावे असोत वा पुरस्कारप्राप्त गावे असोत. त्यांना त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल ७० ते ७५ गुण हमखास मिळतात. मात्र, काही गावे विशेष कामगिरी करीत असल्याने पैकीच्या पैकी गुण मिळवितात. एवढे गुण मिळविण्याठी योगदानदेखील तेवढेच द्यावे लागते. त्यामध्ये खरी कसोटी असते. समित्या वादाची प्रकरणे कशी हाताळतात, त्याकामी उर्वरित सदस्य कसे सहकार्य करतात, त्यावर समितीचे यश अवलंबून असते.
तंटामुक्त
अभियान
गावात शांततेसाठी समित्यांचे प्रयत्न आवश्यक.
नव्या अधिकाराचा फायदा.
संघर्ष मिटविण्यासाठी समित्यांचे अधिक प्रयत्न.
ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची.
समन्वयातून रचला जातोय तंटामुक्तीचा इतिहास.
कौटुंबीक कलहावर उपाय हवेत.
जबाबदारीची जाणीव आवश्यक.