Ratnagiri: आजारी वडिलांची सेवा करणारा 'प्रणय' ऐन तारूण्यात गेला; सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:28 IST2025-08-09T18:27:37+5:302025-08-09T18:28:12+5:30
अंगणातील कचरा काढताना घामाघूम झाला. तत्काळ खासगी दवाखान्यात आणले, पण..

Ratnagiri: आजारी वडिलांची सेवा करणारा 'प्रणय' ऐन तारूण्यात गेला; सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला
सचिन मोहिते
देवरुख : वडील गेले काही दिवस पॅरालिसिसने आजारी, त्यांना अंघोळ घालणे, जेवण भरवणे, वेळच्या वेळी गोळ्या देणे, त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांची सेवा करणाऱ्या तरुण मुलाचे हात अचानक आता थांबले आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बौद्धवाडी येथील प्रणय नंदराज मोहिते याने वयाच्या २५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जगण्यातून अनपेक्षित एक्झिट घेतली आहे. ऐन उमेदीतील या तरुणाच्या जाण्याने सर्वांनाच हुरहुर लागली आहे. ही घटना मंगळवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गावातील प्रणयचे शिक्षण रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाले. प्रणयने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रंगमंचीय कला जोपासली होती. तो उत्तम कलाकार होता. माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ तेर्ये यात तो चांगल्या प्रकारे भूमिका करून कला सादर करीत होता आणि एका मेडिकल कंपनीमध्ये तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होता.
प्रणयचे वडील गेली काही वर्षे अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. त्यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नोकरी केली. गेली पाच ते सहा वर्षे ते आजारी असल्याने त्यांची नियमित सेवा प्रणय आपल्या आईसमवेत करीत होता. वडिलांना अंघोळ घालणे, त्यांना उचलणे, औषध देणे यासोबत त्यांच्या बरोबर गप्पा मारुन त्यांच्या मनावरील आजारपणाचे ओझे हलके करण्यास साहाय्य करत होता.
प्रणयने मंगळवारी आपल्या मोठ्या भावाला संगमेश्वर बसस्थानकात सोडले आणि घरी परत आल्यावर तो अंगणातील कचरा काढत होता. यावेळी तो घामाघूम झाला. त्याच्या पाठीत-छातीत दुखू लागले. त्याच्या आईने आणि त्याचा चुलत भाऊ अजित मोहिते यांनी तत्काळ बुरंबीतील खासगी दवाखान्यात आणले. तेथील डॉक्टरांनी तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय गाठण्यास सांगितले. तेथून प्रणयला संगमेश्वर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, याचदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याचे असे जाणे साऱ्यांसाठीच धक्कादायक ठरले आहे. प्रणयच्या पश्चात त्याची आई-वडील, मोठा भाऊ, बहीण, वहिनी असा परिवार आहे.