म्हाप्रळ बंदरात दहा संक्शन पंपासह १५ बोटी ताब्यात
By Admin | Updated: May 16, 2016 00:37 IST2016-05-16T00:29:32+5:302016-05-16T00:37:56+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : ९२ लाखांचा वाळूसाठा जप्त

म्हाप्रळ बंदरात दहा संक्शन पंपासह १५ बोटी ताब्यात
मंडणगड : नूतन जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी चिन्मय पंडित यांच्यासमवेत तालुक्यातील म्हाप्रळ रेती बंदर परिसरात संक्शन पंपाच्या मदतीने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात रविवारी पहाटे तीन वाजता धडक कारवाई केली. या कारवाईत दहा संक्शन पंप, १५ बोटी, तीन डंपर व ९२ लाखांचा वाळूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी बोटींवर काम करणाऱ्या कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी चिन्मय पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी म्हाप्रळ रेती बंदर परिसरात केलेली कारवाई गुप्त ठेवण्यात आली. यासंदर्भात महसूल विभागासही कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. रविवारी रात्री ११ वाजता विभागीय पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात सूचित करण्यात आले.
यानंतर बंदोबस्ताच्यादृष्टीने बाणकोट व मंडणगड पोलिस ठाण्यांना यासंदर्भात कळवण्यात आले. जिल्हाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी एका खासगी वाहनाने मंडणगड येथे आले. यादरम्यान कारवाईचा पुढील आराखडा ठरला. एका खासगी मच्छिमारी बोटीने उंबरशेत येथून जिल्हाधिकारी व पोलिस पथकाने तीन वाजण्याच्या सुमारास खाडीच्या मार्गाने कारवाईकरिता म्हाप्रळ येथे प्रयाण केले. यावेळी म्हाप्रळ रेती बंदर येथे म्हाप्रळ आंबेत पुलाखाली संक्शन पंपाने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही संक्शन पंप खाडीकिनारी वाळू उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले.
म्हाप्रळ रेती बंदर परिसरात हातपाटीच्या मदतीने वाळू उपसा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. संक्शनचा वापर हा पूर्णपणे बेकायदा असल्याने घटनास्थळी उपसा करीत असलेले सर्वच पंप कायदेशीर कारवाईच्या फेरीत अडकले. या कारवाईत या होड्यांवर काम करणाऱ्या अनेक कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईसंदर्भात तहसीलदार कविता जाधव यांना विचारणा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत म्हाप्रळ येथीस अवैध वाळू उपशासंदर्भात माहिती मिळाल्याने त्यांनी थेट खाडीपात्रात उतरून कारवाई केल्याची माहिती दिली.
दरम्यान, दापोलीचे प्रांताधिकारी जयराम देशपांडे, मंडणगडच्या तहसीलदार कविता जाधव, पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिसांच्या पथकाने रविवारी दिवसभर वाळू उपशाविरोधातील कारवाईच्या पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण केले़ सायंकाळी उशिरा मंडणगड पोलिस ठाण्यात महसूल विभागाकडून यासंदर्भात फिर्याद दाखल होणार असून, गुन्हा नोंद करण्याचे कामकाज सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. जप्त केलेले दहा संक्शन पंप महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात बुडवून टाकले असून, बोटी व वाळूसाठा पंचनामा करून म्हाप्रळचे पोलिसपाटील आदेश धाडसे यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)