जिल्हा बँकेतील राजकारण तापले...!-- गद्दार गद्दाराला भेटले : शेट्ये
By Admin | Updated: April 17, 2015 00:05 IST2015-04-16T23:29:30+5:302015-04-17T00:05:06+5:30
उत्सुकता शिगेला : आरोप-प्रत्यारोपाला छुप्या उलथापालथीची झणझणीत फोडणी

जिल्हा बँकेतील राजकारण तापले...!-- गद्दार गद्दाराला भेटले : शेट्ये
रत्नागिरी : स्वत:ला राष्ट्रवादीतील मोठे नेते समजणारे माजी आमदार रमेश कदम हे गद्दार आहेत. ते राष्ट्रवादीत आहेत की नाहीत, अशी शंका घ्यावी इतपत त्यांचे वर्तन संशयास्पद आहे. एकदा शेकापमध्ये जाऊन गद्दारी केली. पुन्हा परतले. भास्कररावांविरोधात गद्दारी केली. आता याच गद्दार कदमांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीतून गद्दारी करुन बाहेर पडलेल्या नेत्याशी युती केली आहे. त्याद्वारे आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेच्या विरोधात ते गरळ ओकत आहेत. याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आपण पक्षाकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी दिली.
जिल्हा बँकेची निवडणूक येत्या ५ मे रोजी होत असून, त्यासाठी राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गेल्या आठ वर्षांच्या काळात डॉ. तानाजी चोरगे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा बँकेने चांगली प्रगती केली आहे. वसुलीसाठी वाईटपणा घेतला गेला, तोही बँकेच्या हितासाठी होता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवर राग ठेवणे हे पटणारे नाही.
तोट्यात असलेली बँक फायद्यात आणून एनपीए शून्य टक्क्यावर आणला. बँकेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. असे असतानाही केवळ व्यक्तीगत द्वेषापोटी रमेश कदम हे जिल्हा बँकेवर आरोप करत आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाखाली आहे. असे असताना आपल्याच पक्षाच्या लोकांना खाली खेचण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांच्यामागे अन्य बाह्यशक्ती उभी असल्याचे दिसत आहे.
रमेश कदम जर कोणाचे ऐकत नाहीत तर त्यांना पक्षात राहण्याचा अधिकार काय. त्यामुळे आपण पक्षाध्यक्ष व निरीक्षकांकडेही याबाबत तक्रार केल्याचे शेट्ये यांनी सांगितले. त्यामुळे आता पक्षपातळीवरून कारवाईची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
रमेश कदमांचा सहकार पॅनेलला उपद्रव?
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करीत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांना वेठीस धरले आहे. कदम यांनी थेट आव्हान दिल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला ते तापदायी ठरणार आहे.
जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना सहकार पॅनलने डॉ. तानाजी चोरगे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस यांना एकत्र घेऊन पॅनल तयार केले, तर शिवसेनेने शिवसंकल्प नावाचे पॅनल तयार करुन त्यांना आव्हान दिले. सहकार पॅनलचे उमेदवार जाहीर होतानाच माजी आमदार कदम यांनी सहकार पॅनलमधील ८० टक्के संचालकांवर नोकर भरतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना उमेदवारी देऊ नये. सहकार क्षेत्रात चांगले उमेदवार निवडून द्यावेत, असे कदम यांनी सांगितले. त्यानंतर चोरगे यांनी संचालकांच्यावतीने कुटुंबप्रमुख म्हणून कदम यांचे आरोप परतून लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे कदम अधिक दुखावले व चोरगे-कदम असा संघर्ष सुरु झाला. कदम यांनी चोरगेंचा संबंध काय? इथपर्यंत सारा वृत्तांत पत्रकार परिषदेत सादर केला. यावेळी त्यांनी चोरगेंवरही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप केले. चोरगे यांनीही कदम यांच्याबाबत माहिती दिली. यातून हा संघर्ष अधिकच पेटत गेला.
जिल्हा बँकेवर चांगल्या उमेदवारांना निवडून द्या, अशी आरोळी देत कदम यांनी स्वपक्षातील नेत्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळा रंग आला आहे. १९७४ पासून कदम नगरसेवक, नगराध्यक्ष, पक्षाचे तालुकाध्यक्ष, आमदार व आता प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आमदार म्हणून त्यांनी अनेकांची कामे केली आहेत. सातत्याने राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांशी थेट संबंध आहेत. त्यामुळे कदम काही मते सरकवू शकतात. कदम यांनी कोणाला पाठिंबा देण्याबाबत घोषणा केलेली नाही. परंतु, शिवसंकल्प पॅनलचे प्रमुख सुभाष बने, आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक हे कदम यांच्या निवासस्थानी गेल्याने कदम त्यांना मदत करतील. राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नीतीचा वापर केला जातो. शिवाय ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्ष म्हणून लढविली जात नसल्याने त्याचा फायदा उचलून कदम स्वकिय नेत्यांना वेठीस धरत आहेत.
चिपळूण तालुक्यात कृषी मतदार संघात ४३ मते आहेत. सत्ताधारी सहकार पॅनलकडे ३६ मते हक्काची असल्याचा दावा केला जातो. परंतु, कदम यांच्यामुळे यातील काही मते ही विरोधी पॅनलकडे सरकू शकतात. कदम आमदार असल्याने संगमेश्वर तालुक्याशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे तेथेही त्यांचा वापर केला जाईल. एकूणच कदम यांचा विरोध हा डॉ. चोरगे व संचालक संजय रेडीज यांना आहे. शिवाय ते दोघेही चिपळूणमधून रिंगणात आहेत. त्यांना अधिकाधिक ताप देण्याचा प्रयत्न कदम करणार हे निश्चित. माजी खासदार व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गोविंदराव निकम यांचा हात धरुन कदम राजकारणात आले. त्यांचाच निष्ठावंत कार्यकर्ता अनंत तेटांबे चोरगे यांच्यासमोर उभे आहेत. तेटांबे हेही निकम समर्थक आहेत. ते आता शिवसेनेच्या पॅनलमधून उभे असले तरी त्यांची नाल काँग्रेस राष्ट्रवादीशी जुळलेली आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवताना फार यातायात करावी लागणार नाही. माजी आमदार कदम त्यांना सहकार्य करतीलच. शिवाय शिवसेनेचे सर्व नेते पक्ष म्हणून भक्कमपणे त्यांच्या पाठिशी आहेत. चोरगे यांची किती मते कमी करतात, यावरच चोरगे यांचा विजय अवलंबून आहे. प्रथमच या निवडणुकीत चिपळूणमध्ये तगडे आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रमेश कदम यांनी आरोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केल्याने आणि त्यातही विद्यमान सहकार पॅनेलच्या ८० टक्के संचालकांवर नोकर भरतीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक हळूहळू तापू लागल्याचे दिसून येत आहे.
रमेश कदम यांच्या या आरोपांना विद्यमान अध्यक्ष तानाजी चोरगे यांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे कदम यांनी आरोप करण्याचा सपाटाच लावल्याने आणि आता तर कदम यांच्या पाठीशी सेनेचे नेतेही उभे राहिल्याने या साऱ्या घडामोडींना सहकार पॅनल कसे सामोरे जाते? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
शिवसेनेचे टिष्ट्वस्ट
दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम यांना आपल्या तंबूत वळवण्याचा अचानक केलेला प्रयत्न यामुळे तर राजकारणाला या पडद्यामागच्या उलथापालथीची फोडणीच मिळाली आहे. शिवसेनेच्या गोटात कदम यांचा वावर वाढू लागल्याने जिल्हा बँक निवडणुकीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेने या निवडणुकीत ‘टिष्ट्वस्ट’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
कुमार शेट्ये म्हणाले...
चोरगे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा बँकेने चांगली प्रगती केली आहे.
आपल्याच पक्षाच्या लोकांना खाली खेचण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांच्यामागे अन्य बाह्यशक्ती उभी असल्याचे दिसत आहे.
पक्षाध्यक्ष, पक्षनिरीक्षकांकडे केली तक्रार.