आता तुम्ही म्हणाल, आजच्या डिजिटल युगात कोण कशाला पेन वापरणार? लॅपटॉप, मोबाइलवर टाइप करणे किती सोपे आणि सोयीचे. एकापरीने बरोबर आहे तुमचे; पण माझ्या मनातील पेनची जागा लॅपटॉप, मोबाइल नाही घेऊ शकत. कोणतीही भावभेट ही अमूल्य असते. भेटीच्या माध्यमातून एकमेकांप्रती असलेला आदरभाव, प्रेम, आपुलकी व्यक्त होत असते. मला जेव्हा कोणी भावभेट देते, तेव्हा त्या व्यक्तीने माझ्याबद्दल बराच विचार केलेला असतो. माझी आवडनिवड, माझा स्वभाव, माझे कार्यालयीन/ सामाजिक स्थान, माझी वैचारिक बैठक, त्या वस्तूची उपयोगिता इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. वेळ, पैसा, एनर्जी देऊन माझ्यासाठी ती भेट आणलेली असते. एवढे मात्र नक्की, भेटीचे मूल्य किमतीवर ठरत नसून त्यामागच्या भावनेवर ठरते. आजच्या ताणतणावाच्या परिस्थितीत, माझी आवड लक्षात घेऊन मला भेट मिळणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
देवाच्या आशीर्वादाने, पूर्वपुण्याईमुळे ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला बऱ्याच भावभेटी मिळाल्यात. एक भरलेपणाची जाणीव आहे. कृतज्ञतेची जाणीव मन व्यापून आहे. आता खरे म्हणजे, हे सेवानिवृत्तीचे वय. कित्येक वर्षांपासून अथक काम करत आहे. अनेक चढ-उतार बघितले. आता स्थिरावलो आहे. निवृत्तीचा विचार मनात आला की हुरहुर लागते. तेव्हा, आजपर्यंतच्या आयुष्यात कळत-नकळत मिळालेल्या असंख्य भावभेटींचे, आशीर्वादाचे, संधींचे, उपलब्धीचे स्मरण केले, तर ओंजळी किती भरलेली आहे ते समजते. या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. सर्वांचा नामोल्लेख करणे अवघड आहे; पण आशा आहे, माझी कृतज्ञतेची भावना सर्वांना पोचेन. देवाकडे माझी एकच प्रार्थना.
‘जीवने यावद् आदानम्- स्यात् प्रदानं ततोऽधिकम्’
आपल्याला जे प्राप्त होते त्यापेक्षा जास्त देण्याची वृत्ती माझ्यात यावी.
कृतज्ञ मी! कृतार्थ मी!
डॉ. मिलिंद दळवी,
सावंतवाडी, सिंधुदुर्ग.