ऐन पावसाच्या तोंडावर महामार्गाचे ‘पॅचवर्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:44+5:302021-05-31T04:23:44+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ येथे खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ...

Patchwork of highway in the face of heavy rains | ऐन पावसाच्या तोंडावर महामार्गाचे ‘पॅचवर्क’

ऐन पावसाच्या तोंडावर महामार्गाचे ‘पॅचवर्क’

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ येथे खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. काही दिवसांवरच पावसाळा येऊन ठेपला असताना, आता ठेकेदार कल्याण टोलवेज कंपनीकडून पॅचवर्क पध्दतीने डांबरीकरण केले जात आहे. अत्यंत घाईघाईने होत असलेले हे डांबरीकरण न टिकल्यास दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत व कामाविषयी आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची कानउघाडणी केली होती. त्यावर कशेडी ते लोटे आणि चिपळूण ते आरवली दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आठवडाभरात सुरू करण्यात येईल, असे ठेकेदारांनी कबूल केले होते. सध्या खेड हद्दीतील चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी पॅचवर्कचे काम शिल्लक आहे. तसेच चिपळूण हद्दीत परशुराम घाट व कामथे, सावर्डे विभागात डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात खड्ड्यांची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेळीच डांबरीकरणाच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आता ऐन पावसाच्या तोंडावर हे काम सुरु केले आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार विविध कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले. त्या-त्या रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना तेथील रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. मात्र, दरवर्षी खड्डे व अन्य उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जाते. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अ‍ॅड. ओवीस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.

कोट

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे व अन्य उपाययोजनांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही सुनावणी लांबली आहे. लवकरच यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी सध्याची परिस्थितीही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली जाणार आहे.

- अ‍ॅड. ओवीस पेचकर, उच्च न्यायालयाचे वकील

Web Title: Patchwork of highway in the face of heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.