पालीचा आठवडा बाजार अनिश्चित काळासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:22+5:302021-04-10T04:30:22+5:30
पाली : पाली विभागात आठवडाभरात बारा कोरोना रुग्ण सापडल्याने अखेर पालीचा आठवडा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ...

पालीचा आठवडा बाजार अनिश्चित काळासाठी बंद
पाली : पाली विभागात आठवडाभरात बारा कोरोना रुग्ण सापडल्याने अखेर पालीचा आठवडा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायतीने घेतला आहे.
गेल्या आठवडाभरात विभागात पाली, कापडगाव, खानू आणि बांबर या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळले होते. पालीचा आठवडा बाजार हा येथील २०-२५ गावांचा असून, तो मोठ्या प्रमाणावर भरतो. त्यामुळे बाजारात गर्दी झालेली असते. तसेच मोक्याच्या ठिकाणी ठेवलेल्या सॅनिटायझरचा वापर करत नाहीत त्यामुळे सध्या वाढत चाललेल्या कोरोनाचा आलेख पाहता हे संक्रमण तोडणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतीने आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
सद्य:स्थितीत मिनी लॉकडाऊन असून, बाजार वगळता उर्वरित बाजारपेठेवर या लॉकडाऊनचा कसलाच परिणाम जाणवत नाही. बाजारपेठ उघडी असल्याने व सर्वच्या सर्व दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या सुरू असल्याने त्यानिमित्त नागरिकांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर आहे.
पालीचा आठवडा बाजार बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ असून, यापूर्वी संपूर्ण लॉकडाऊन झाले तेव्हा हा बाजार बंद होता. त्यानंतर गेल्या फेब्रुवारीत २४ व ३ मार्च या दोन दिवशी बाजार बंद होता. तर सद्य:स्थितीत ७ एप्रिलपासून बंद ठेवलेला आठवडा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवला जाणार आहे.