कृषी विद्यापीठाचे भातबियाणे शिल्लक
By Admin | Updated: July 2, 2015 00:28 IST2015-07-01T22:43:22+5:302015-07-02T00:28:43+5:30
अनुदान रद्द : शेतकऱ्यांनी फिरवली खरेदीकडे पाठ

कृषी विद्यापीठाचे भातबियाणे शिल्लक
शिवाजी गोरे -दापोली -कोकणातील भातशेती परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाताचे पीक घेणे बंद केले आहे. अनेक शेतकरी भातपीक घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून ७५ टक्के सबसिडी दिली जात होती. शेतकरी दरवर्षी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या भाताच्या बियाण्याची पेरणी करुन अधिक उत्पन्न घेत होता. परंतु यावर्षी सरकारने भात बियाण्यावरील अनुदान बंद केल्याने विद्यापीठाच्या बियाण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, चारही जिल्ह्यातील विक्री केंद्रात आज अखेर बियाणे शिल्लक आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून निर्माण केलेल्या बियाण्यांमुळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे भातशेतीला चांगले दिवस येवू लागले होते. पारंपरिक बियाण्यांची पेरणी करून पीक घेणे बंद करुन शेतकरी विद्यापीठचे सुधारित बियाणं पेरून उत्पादन घेऊ लागला होता. भात बियाणं महाग असलं तरीही भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारनंच मदतीचा हात दिला होता. त्यामुळे चांगल्या जातीचं महागड बियाणंसुद्धा शेतकरी खरेदी करत होता. सरकारी अनुदानामुळे कृषी विद्यापीठ भात बियाणं सहज उपलब्ध करून देत होतं. परंतु अनुदान बंद झाल्यामुळे सधन शेतकऱ्यांनी भात बियाणे रोखीत खरेदी केलं. परंतु गरीब शेतकऱ्याला महागडं बियाणं खरेदी करण्याची ऐपत नसल्याने त्यांनी नवीन बियाण्याकडे पाठ फिरवली आहे.
सुमारे ६० टक्के शेतकऱ्यानी जुनेच बियाणं आपल्या शेतीत पेरल्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. भात पिकाच्या उत्पन्नात घट होऊ शकते, असा दावा आता तज्ज्ञ मंडळी करु लागली आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाबीज कंपनीकडून ५ हजार क्विंटल भात बियाण्याची उचल केली. कृषी विद्यापीठाच्या बियाण्याला दरवर्षी शेतकऱ्याचा असलेला प्रतिसाद पाहून यावर्षी अधिकच बियाणे महाबीजकडून मागवण्यात आले. परंतु सरकारने अनुदान बंद केल्यामुळे कृषी विभाग व शेतकऱ्याकडून बियाण्यांची उचल कमी झाली.
पेरणी होऊन रोपे लावणीला आली आहेत. तरीसुद्धा दरवर्षी मे महिन्यात संपणारे भात बियाणे विद्यापीठाच्या विक्री केंद्रात पडून आहे. कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ७ बियाणे केंद्रात शेकडो क्विंटल बियाणे शिल्लक आहे. त्यामुळे एवढ्या बियाण्याचं करावं काय? असा प्रश्न विद्यापीठासमोर उभा आहे.
उत्पन्नावर परिणाम होणार?
सरकारने भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी अनुदान सुरु ठेवायला हवे होते. परंतु अनुदान बंद करुन कोकणातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. यामुळे शेतकऱ्याने गेल्या वर्षीच्या जुन्या बियाण्याची पेरणी केली असून, त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे यावर्षी राज्याच्या भात उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दुसरीकडे कृषी विद्यापीठाकडे तयार असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.