मोजक्याच नौकांनी गाठला मासेमारी हंगामाचा मुहूर्त, रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:50 IST2025-08-02T18:50:14+5:302025-08-02T18:50:37+5:30
नारळी पौर्णिमेचा मुहूर्त

संग्रहित छाया
रत्नागिरी : मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक खलाशी असलेल्या मच्छीमारांनी मासेमारीचा मुहूर्त साधला. मागील काही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र, ऐन हंगामाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे केवळ १५ ते २० टक्केच मासेमारी नौकांनी समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही मच्छीमारांनी किनारी भागात सुमारे १० वाव परिसरात मासेमारीचा मुहूर्त केला.
शासनाने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळासाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा मोसम पावसाळा आणि माशांचा प्रजननकाळ असल्यामुळे मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत. बंदीचा कालावधी संपुष्टात आला असून शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी मुहूर्त साधण्याचा काहींनी प्रयत्न केला. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला सुरुवात होते. मात्र सध्याच्या वातावरणामुळे बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जाण्यासाठी तयारी झालेली नाही. त्यामुळे सर्वांत मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे शुकशुकाट होता.
वातावरणात मळभ कायम असल्याने, तयारी झालेली असतानाही अनेक नौकांनी शुक्रवारी मुहूर्त शनिवारवर ढकलला आहे. केवळ १५ ते २० टक्के नौकांनी मासेमारीचा मुहूर्त साधला. यामध्येही ट्रॉलिंग करणाऱ्यांचे संख्या अत्यल्प असून गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांचा टक्का अधिक आहे.