एका क्लिकवर मिळणार कोकणातील पिकांची माहिती, कोकण कृषी विद्यापीठाकडून संकेतस्थळ अद्ययावत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:23 IST2022-12-14T13:16:32+5:302022-12-14T13:23:40+5:30
पिकांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून ॲण्ड्रॉइड फोनवरही उपलब्ध होणार

एका क्लिकवर मिळणार कोकणातील पिकांची माहिती, कोकण कृषी विद्यापीठाकडून संकेतस्थळ अद्ययावत
शिवाजी गोरे
दापोली : कोकणातील पिकांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान अवजारे, शेती सल्ला शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होण्यासाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच दापोली येथील माहिती तंत्रज्ञान कार्यालयात कोकणातील पिकांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून ॲण्ड्रॉइड फोनवरही उपलब्ध होणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हे पेपरलेस पद्धतीने जोडले जात आहेत.आधुनिक काळात शेतकऱ्यांच्या हातामध्ये ॲण्ड्रॉइड मोबाइल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. याचा विचार करून कोकण कृषी विद्यापीठाने त्यांचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या संकेतस्थळाच्या माध्यमातून पिकांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान अवजारे यासह शेतीविषयक सल्ला देण्यात येणार आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सहली दापोली कोकण कृषी विद्यापीठाला भेट देण्यासाठी येतात. या सहलीदरम्यान कोकणातील भातशेती, नारळ, सुपारी, मसाला पिके, आंबा, काजू व विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान, अवजारे ही सर्व माहिती घेण्यास शेतकरी उत्सुक असतात.
परंतु, शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपस्थित होत नाही. त्यामुळे त्यांना माहिती मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने संकेतस्थळ अद्ययावत करण्याकडे लक्ष दिले आहे. तसेच यापूर्वी तयार केलेल्या संकेतस्थळात काही त्रुटी होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या त्रुटीही दूर करण्यात आल्या आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रातील पिकांची व आधुनिक संशोधन तंत्रज्ञान या सर्वांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. स्कॅन केलेली माहिती पीडीएफच्या माध्यमातून मोबाइलमध्ये डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातीलच शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे.
सध्या सर्व कामकाज पेपरलेस होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाइलवर सहज माहिती उपलब्ध व्हावी. तसेच शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, पिकावरील रोग ही सर्व प्रकारची माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. - डॉ. संजय सावंत, कुलगुरु, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली