घरात घुसलेल्या बिबट्यापासून वृद्धाने वाचवले अख्खे कुटुंब!, रत्नागिरी जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:20 IST2025-10-09T13:20:41+5:302025-10-09T13:20:54+5:30
साखरपा : बिबट्याच्या रूपात काळ समोर आला होता; पण ६५ वर्षीय वृद्धाने प्रसंगावधान राखले आणि आपल्या ९५ वर्षांच्या वडिलांसह ...

घरात घुसलेल्या बिबट्यापासून वृद्धाने वाचवले अख्खे कुटुंब!, रत्नागिरी जिल्ह्यातील घटना
साखरपा : बिबट्याच्या रूपात काळ समोर आला होता; पण ६५ वर्षीय वृद्धाने प्रसंगावधान राखले आणि आपल्या ९५ वर्षांच्या वडिलांसह घरातील सर्वांचे प्राण वाचवले. काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीत. अशोक गंगाराम रवंदे यांनी घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून अख्खे कुटुंब वाचवले आहे.
किरबेट ओझरवाडीत राहणारे अशोक रवंदे बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घराबाहेर गेले. नेमका त्याचवेळी कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या घरात शिरला. रवंदे पुन्हा घरात आले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. मात्र, घरातील कुत्र्याचा आवाज आल्याने त्यांनी घरातील दिवे सुरू केले. त्यावेळी बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मात्र, घराचे सर्व दरवाजे बंद असल्याने बिबट्याला घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यावेळी घरात अशोक रवंदे यांचे ९५ वर्षांचे वडील गंगाराम सीताराम रवंदे, सुंदराबाई रामचंद्र रवंदे (वय ६०), अशोक यांची पत्नी शेवंती रवंदे (वय ५५), अशी माणसे होती. यावेळी काय करायचे ते कोणालाच सूचत नव्हते.
हा सारा प्रकार अर्धा तास सुरू होता. बिबट्याने कुत्र्याला पकडले होते. अशोक रवंदे यांनी धाडस करून दरवाजापर्यंत गेले. त्यांनी दरवाजा उघडला आणि ते पाहून बिबट्याने तेथून धूम ठोकली. अशोक यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबतची माहिती पोलिस पाटील प्रदीप अडबल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन रवंदे यांच्या कुटुंबाची विचारपूस केली.