यापुढे परजिल्ह्यातील व्यक्तींना जमिनी विकायच्या नाहीत, रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने केला ठराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 17:33 IST2025-09-11T17:33:09+5:302025-09-11T17:33:35+5:30
जागांच्या विक्रीनंतर गावात पारंपरिक पाऊलवाटा, रस्त्याच्या समस्या निर्माण झाल्या

यापुढे परजिल्ह्यातील व्यक्तींना जमिनी विकायच्या नाहीत, रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने केला ठराव
चिपळूण : गावातील जमिनी परगावातील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकू नयेत. एखाद्या कुटुंबाला आर्थिक गरजेपोटी जमीन विकायची झाल्यास ती गावातील लोकांना विकावी, असा ठराव चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आला. या ठरावामुळे परप्रांतीय लोकांना जमीन विकण्यास आळा बसणार आहे.
गेल्या काही वर्षांत तालुक्यातील मोरवणे येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार सुरू आहेत. अनेक परप्रांतीय लोकांनी मोरवणे येथे जागांची खरेदी करून ठेवली आहे. या जागांच्या विक्रीनंतर गावात पारंपरिक पाऊलवाटा, रस्त्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयाेजित केलेल्या ग्रामसभेत गावातील जमिनी परजिल्ह्यातील लोकांना न विकण्याचा ठराव करण्यात आला.
ग्रामसभेतील चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी सांगितले की, मोरवणे येथे परजिल्ह्यातील लोक जमिनी खरेदी करीत आहेत. जमिनींची खरेदी झाल्यानंतर संबंधित लोकांकडून जागेला संरक्षक भिंत बांधली जाते. त्यानंतर नेहमीच्या पाऊलवाटा, रस्ते आदी समस्यांना त्या-त्या वाडीतील लोकांना सामोरे जावे लागते. यावरून सातत्याने वादविवाद सुरू आहेत. पाऊलवाटा बंद झाल्या की संबंधित लोक ग्रामपंचायतीकडे तक्रारी करतात, असे सांगण्यात आले.
गावातील एखाद्या कुटुंबास काही आर्थिक गरजेपोटी काही जमीन विकावयाची झाल्यास प्रथमतः त्याची माहिती गावातील लोकांना द्यावी. गावातील जमीन खरेदी करणारे प्रचलित दराची रक्कम संबंधित व्यक्तीला देऊ शकतील. गावातील लोकांना पारंपरिक रस्ते आणि पाऊलवाटांची चांगली माहिती असते. त्यामुळे परगावातील लोकांना गावकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असा ठराव एकमताने करण्यात आला.
ठरावाची प्रत अधिकाऱ्यांना
ठरावाची प्रत जमीन खरेदी-विक्रीची नोंदणी करणाऱ्या दुय्यम सहायक निबंधक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याशिवाय याबाबत जनजागृती होण्यासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी तसे फलकही लावण्यात आले आहेत.
गावातील जमिनी परगावातील लोकांना विकल्यानंतर विविध समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेत जमिनी परगावातील लोकांना न विकण्याचा ठराव केला आहे. - सचिंता जाधव, सरपंच, मोरवणे.