निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
By अरुण आडिवरेकर | Updated: September 21, 2022 18:04 IST2022-09-21T17:46:31+5:302022-09-21T18:04:52+5:30
बंदराला रस्ते वाहतूकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण

निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
रत्नागिरी : कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे आज, बुधवारी (दि.२१) दिली.
राज्याच्या आणि कोकणच्या विविध विकासात्मक विषयांसंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी, निवळी - जयगड रस्त्याच्या कामाची पूर्तता लवकरच होणार असल्याचे वचन मंत्री गडकरी यांनी उदय सामंत यांना दिले.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, निवळी - जयगड रस्त्याचा प्रस्ताव पाठीमागे झालेल्या बैठकीत सादर करण्यास सांगितले होते. याबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून, हा रस्ता चौपदरी झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, निवळी - जयगड रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होणार असून, वाहतूक कोंडीस आळा बसणार आहे. बंदराला रस्ते वाहतूकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.