नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होणार; रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:09 IST2025-07-29T18:08:32+5:302025-07-29T18:09:13+5:30
बंदी लांबणार की नाही?

संग्रहित छाया
रत्नागिरी : जिल्ह्यात १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होत आहे. पावसाळ्यात खवळलेला समुद्र, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मासेमारी बंद होती. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर नौका खोल समुद्रातील मासेमारी करण्यास सज्ज झाल्या आहेत.
महिन्यांचा मासेमारी बंदी कालावधी दोन दिवसानंतर संपत असून, १ ऑगस्टपासून नवा मासेमारी हंगाम सुरु होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून, समुद्रही खवळलेला आहे. लाटा उंच उसळत आहेत. त्यामुळे बंदी उठल्यानंतर मासेमारी लगेचच सुरू होईल का, याबाबत प्रश्नच आहे.
बंदी लांबणार की नाही?
मच्छीमार संघटनेने १५ ऑगस्टनंतर मासेमारी सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर पर्ससीन नेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पर्ससीन नेट नौका मालकांकडून आतापासूनच खलाशांची जमवाजमव सुरू झाली आहे.
डागडुजी करून नौका सज्ज
१ जूनपासून मासेमारी बोटी समुद्रकिनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या असतात. मासेमारीबंदीच्या काळात बोटीच्या इंजिनची देखभाल दुरुस्ती व डागडुजी, बोटीची रंगरंगोटी होते. तसेच याच काळात जाळ्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्यांची खरेदी तसेच नौकांची रंगरंगोटीही करण्यात आली आहे.