पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे
By मनोज मुळ्ये | Updated: July 29, 2023 15:25 IST2023-07-29T15:24:15+5:302023-07-29T15:25:18+5:30
रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये

पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे
रत्नागिरी : प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा उत्तर भारतीयांचा मेळावा घेत आहेत, ही बाब त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना पावसाळ्यानंतर सभा, बैठका सुरू करेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आलेल्या सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमंशी संवाद साधला. ठाकरे शिवसेना उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहे. त्याविषयी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे महाअधिवेशन घेतले होते. यात पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या दीर्घ भाषणात पक्षाची ध्येयधोरणे मांडली आहेत. त्यानुसारच पक्षाची भूमिका असेल ते म्हणाले. राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, काही काळ थांबावे लागेल. काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला काम करता आले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. याबाबतच्या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांचे योगदान खूप मोठे आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ते मंत्रालयात काम करत असत. पण त्यांच्या क्षमतेचा उपयोग करुन घेतला गेला नाही.
रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका सतत बदलत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये. जी गोष्ट लोकांच्या हिताची आहे, त्यात पक्षाची भूमिका महत्त्वाची असता नये. एखाद्या प्रकल्पाची गरज, त्याचे फायदे, रोजगाराची उपलब्धता त्याबाबतची सर्व माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे. प्रकल्पाशी निगडीत चांगल्या वाईट गोष्टी लोकांना समजावून सांगायला हव्यात. लोकांचे शंकानिरसन करायला हवे. मात्र रिफायनरीबाबत तसे झाले नाही.
संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी
महात्मा गांधी यांच्याबद्दल केवळ देशातच नाही तर जगात आदर व्यक्त केला जातो. त्यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी मांडले.