काही वरिष्ठांमुळे माझा पराभव, योग्यवेळी योग्य निर्णय घेणार; राजन साळवी यांनी भूमिका बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:57 IST2025-01-04T11:56:42+5:302025-01-04T11:57:21+5:30
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, ...

काही वरिष्ठांमुळे माझा पराभव, योग्यवेळी योग्य निर्णय घेणार; राजन साळवी यांनी भूमिका बदलली
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाला पक्षातीलच काही वरिष्ठ मंडळी जबाबदार आहेत. जर ते शोधून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच इतरांवरही येईल, असे स्पष्ट सांगतानाच माजी आमदार राजन साळवी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, अशी भूमिकाही प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडली.
आपण उद्धवसेनेतच राहणार, अशी भूमिका राजन साळवी यांनी गुरुवारी मांडली होती. मात्र, राजापूर आणि लांजा येथे उद्धवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे सूतोवाच केले आहे. काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे आपला पराभव झाल्याचे त्यांनी यावेळी नाव न घेता सांगितले.
गुरुवारी आपण पत्रकार परिषद घेतल्यानंतर राजापूर येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माझ्यावर अन्याय झाला असल्याचे मत त्यांनी मांडले आणि आपल्याला ठाम भूमिका घेण्याचा आग्रह केला. शुक्रवारी आपण लांजा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनीही हीच भूमिका मांडली. त्यामुळे आपण योग्य वेळी आपण याेग्य निर्णय घेऊ, असे आपण ठरवले असल्याचे साळवी यांनी सांगितले. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू, अशी खात्री आपल्याला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दिली आहे, असेही ते म्हणाले.
‘त्यां’च्यावर कारवाई करा
काही वरिष्ठ मंडळी आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आपल्याही मान्य आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी हे लोक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. जर कारवाई झाली नाही तर जी वेळ आपल्यावर आली, तशीच वेळ अन्य कोणावरही येऊ शकते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी योग्यवेळी निर्णय घ्यायला हवा, असे ते म्हणाले.