मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरला पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
By मनोज मुळ्ये | Updated: March 30, 2023 16:32 IST2023-03-30T15:58:17+5:302023-03-30T16:32:18+5:30
चौपदरीकरण कामाची केली हवाई पाहणी

मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरला पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
रत्नागिरी : विविध कारणांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्प्यातील काम रखडले आहे. आता त्यालाही गती आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल आणि जानेवारीमध्ये कोकणवासीय नव्या महामार्गावरुन जातील, असे रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. या मार्गातील काही प्रलंबित कामांसाठी २२० कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली.
रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी पत्रकार परिषदेत त्यांनी महामार्ग चौपदरीकरण कामाचा आढावा घेतला. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उदय सामंत उपस्थित होते.
मंत्री गडकरी यांनी रायगड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून रत्नागिरीत येताना महामार्ग चौपदरीकरण कामाची हवाई पाहणी केली. दहा टप्प्यात या चौपदरीकरण कामाची विभागणी करण्यात आली होती. त्यातील केवळ दोन टप्प्यातील कामच २६ ते २७ टक्के झाले आहे. बाकी काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या रखडलेल्या कामालाही गती आली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले.