रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:33 IST2022-05-04T14:28:21+5:302022-05-04T14:33:41+5:30

भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.

Morning Ajaan now without honking, An important decision was taken by the Muslim brothers in Ratnagiri | रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

रत्नागिरी : राज्यात मशिदीवरील भाेंग्यावरुन वातावरण ढवळून निघाले असतानाच रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनी महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रत्नागिरी शहरात सकाळच्या अजानवेळी भाेंग्याचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. तसेच भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, बुधवार ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केले हाेते. मात्र, जिथे भाेंगे वाजतील तिथे हनुमान चालिसा लावा, असे आदेशही मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांची बैठक रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीला उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पाेलीस निरीक्षक विनीत चाैधरी उपस्थित हाेते. या बैठकीत भाेंग्याच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली.

या चर्चेवेळी सकाळची अजान ही भोंग्याचा वापर न करता केली जाईल, असे उपस्थित मुस्लिम बांधवांनी सांगितले. तसेच भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबाजवणी केली जाईल, अशी स्पष्ट भूमिकाही मांडली. कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची माहिती दिली जाईल, असेही सांगितले.

मनसे पदाधिकाऱ्यांना नाेटीस

जिल्ह्यातील वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांनी रत्नागिरी शहरातील मनसे कार्यकर्त्यांना फौजदारी दंड प्रक्रिया कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे. शहर अध्यक्ष सतीश राणे, उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष गजानन आईर, विभाग प्रमुख अजिंक्य केसरकर, विभाग अध्यक्ष अक्षय माईन, महाराष्ट्र सैनिक धनंजय पाटील यांना ही नाेटीस बजावली आहे.

Web Title: Morning Ajaan now without honking, An important decision was taken by the Muslim brothers in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.