आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर, समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा
By मनोज मुळ्ये | Updated: January 22, 2024 15:32 IST2024-01-22T15:31:56+5:302024-01-22T15:32:54+5:30
कारवाईचा निषेध करणारे फलक झळकवण्यात आले

आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर, समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा
रत्नागिरी : बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांना भावासह साेमवारी रत्नागिरीतील कार्यालयात चाैकशीसाठी हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात आली हाेती. साेमवारी ते कार्यालयात हजर हाेण्यासाठी निघताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली हाेती. यावेळी या कारवाईचा निषेध करणारे फलक झळकवण्यात आले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता.
रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर हाेण्यापूर्वी आमदार साळवी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले हाेते. आमदार साळवी चाैकशीसाठी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते व पदाधिकारीही खासदार राऊत यांच्या कार्यालयात जमा झाले. कार्यकर्त्यांसमवेतच आमदार साळवी आणि त्यांचे भाऊ दीपक प्रभाकर साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले.
कार्यकर्त्यांनी आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राऊत यांचे संपर्क कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय असा कार्यकर्त्यांनी जणू माेर्चाच काढला हाेता. कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी करून या कारवाईचा निषेध केला. घोषणाबाजी होत असतानाच आमदार साळवी दाेन्ही भाऊ दीपक साळवी आणि संजय साळवी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दाखल झाले.