खानू गावात मिश्र लागवडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:32+5:302021-05-31T04:23:32+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील सेंद्रिय शेतीचे गाव अशी ओळख असलेल्या खानू गावातील प्रयोगशील शेतकरी संदीप कांबळे यांनी मिश्र लागवडीचा प्रयोग ...

Mixed cultivation experiment successful in Khanu village | खानू गावात मिश्र लागवडीचा प्रयोग यशस्वी

खानू गावात मिश्र लागवडीचा प्रयोग यशस्वी

रत्नागिरी : तालुक्यातील सेंद्रिय शेतीचे गाव अशी ओळख असलेल्या खानू गावातील प्रयोगशील शेतकरी संदीप कांबळे यांनी मिश्र लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. एका गुंठ्यात मेथी, ज्वारी, कुळीथ लागवड करून चांगले उत्पादन मिळविले आहे.

गतवर्षी लाॅकडाऊन काळात संदीप कांबळे यांनी ‘थ्री लेअर मल्चिंग’चा प्रयोग केला होता. यावर्षी मात्र त्यांनी मिश्र लागवड केली आहे. कोकणातील लाल मातीत ज्वारीचे पीक चांगले होते, हे सिध्द केले आहे. कांबळे यांनी एक गुंठ्यात तीन फुटाचे वाफे तयार केले. ज्वारीसाठी देशी वाण निवडताना ‘मालदांडी’ हे पारंपरिक बियाणे मिरज येथून मागविले. वाफ्यावर प्रत्येकी सहा इंचावर टोकन पध्दतीने ज्वारीचे दाणे टाकले. त्यानंतर पूर्ण क्षेत्रावर मेथी पेरली, तर बेडच्या कडेला दोन दोन कुळीथाचे दाणे पेरले. दोन वेळा पाणी दिले. अवघ्या १५ ते २० दिवसात मेथी तरारून आली. मेथी काढून विक्री केली. मेथी काढल्यानंतर जमीन तर मोकळी झाली शिवाय रानही उगवले नाही. मेथी काढल्यानंतर कुळीथ व ज्वारी राहिली. कुळीथामुळे ज्वारी चांगली वाढली शिवाय जमिनीतील नत्र स्थिर ठेवण्यास मदत झाली. ६० ते ७० दिवसात कुळीथ तयार झाला. अवघ्या क्षेत्रावर कुळीथ पसरल्याने ज्वारीची उंची चांगली वाढली. कणसेही दाण्यांनी लगडली. कुळीथाचे मल्चींग असल्याने दोन वेळा दिलेल्या पाण्यावर ज्वारीचे पीक चांगले आले.

हुरडा भाजण्यासाठी कांबळे यांनी कणसे उपलब्ध करून दिली. चवीबरोबर पिकाचा दर्जाही चांगला राखला गेला. एका गुंठ्यात वीस किलो ज्वारी व २ किलो कुळीथ उपलब्ध झाला. शिवाय मेथी विक्री चांगली झाली. एकूणच मर्यादित जागेत, कमी कष्टात व मेहनतीमध्ये मिश्र लागवडीचा प्रयोग कांबळे यांनी यशस्वी केला आहे.

ज्वारी धान्य म्हणून आहारात वापरली जाते. शिवाय जनावरांसाठी पौष्टीक व सकस चारा आहे. साठवणूक करून ठेवता तर येते. शिवाय कडबा किंवा चारा तसाच जनावरांना घातला जातो. दुभत्या जनावरांसाठी ज्वारी, मका उपयुक्त असून, दुधाची मात्रा वाढते. त्यामुळे मिश्र लागवडीचा हा प्रयोग कोकणातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे.

------------------------

गतवर्षी लाॅकडाऊन काळात ‘थ्री लेअर मल्चिंगचा प्रयोग यशस्वी झाला होता. यावर्षी मिश्र लागवड करून एकाचवेळी दोन ते तीन प्रकारचे उत्पन्न घेण्यात आले. मेथीमुळे गवत आले नाही, तर कुळीथामुळे जमिनीतील नत्र स्थिर राहून पिकाची वाढ चांगली झाली. शेतकऱ्यांना अशाच प्रकारे उत्पन्न घेणे शक्य आहे.

- संदीप कांबळे, खानू.

Web Title: Mixed cultivation experiment successful in Khanu village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.