Ratnagiri: मंडणगडमध्ये ना हेलिपॅड, ना सुसज्ज विश्रामगृह; मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:04 IST2025-05-17T14:02:18+5:302025-05-17T14:04:50+5:30
मंडणगड : गेल्या काही वर्षात तालुक्यात मंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत. मात्र, तालुक्यात विविध सुविधा नसल्याने त्या पुरविताना अधिकाऱ्यांची ...

Ratnagiri: मंडणगडमध्ये ना हेलिपॅड, ना सुसज्ज विश्रामगृह; मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ
मंडणगड : गेल्या काही वर्षात तालुक्यात मंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत. मात्र, तालुक्यात विविध सुविधा नसल्याने त्या पुरविताना अधिकाऱ्यांची धावपळ उडत आहे. राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री याठिकाणी हजेरी लावत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या हेलिपॅडसह विश्रामगृहाची पुरेशी व्यवस्था नसल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या मंत्र्यांच्या दाैऱ्यावेळी प्रशासकीय यंत्रणेची लगीनघाई सुरू हाेते.
मागासलेला तालुका म्हणून प्रशासकीय स्तरावरून अजूनही मंडणगड यातून बाहेर पडलेला नाही. चक्रीवादळ, न्यायालय, यासह विविध कामांच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय, शासकीय पदाधिकाऱ्यांचे दौरे वाढले आहेत. तालुक्यात एकाच वेळी आलेले विविध मंत्री याचबरोबर राष्ट्रपती यांच्या दौऱ्यासाठी करोडो रुपये खर्च काही तासांकरिता करण्यात आला. मात्र, त्यानंतर प्रशासनाने कायमस्वरुपीच्या उपाययोजना करणे अपेक्षित होते. पण, अद्यापही प्रशासनाकडून अशी कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
तालुक्यात मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध मंत्री आले असताना या ठिकाणी शासकीय विश्रामगृह त्याचबरोबर हेलिपॅडची सुविधा नसल्याने यंत्रणेची चांगली तारांबळ उडाली. तसेच तालुक्यात शासकीय विश्रामगृह सुस्थितीत नसल्याने मंत्र्यांना विसावण्याकरिता अथवा बैठक घेण्याकरिता शासनाची जागा उपलब्ध नाही. तसेच याठिकाणी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था होताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मंत्र्यांच्या दाैऱ्यावेळी वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उपस्थित राहतात. मात्र, त्यांची व्यवस्था दापोली, खेड तालुक्यांमध्ये करावी लागते. एका कार्यक्रमात तालुक्यात प्रशासनाकडून अनेक जागा तपासल्यानंतर मानवी वस्तीतील एका जागेत हेलिपॅड तयार करण्यात आले. मात्र, अन्य मंत्र्यांना दापोलीमध्ये हेलिकॉप्टरने यावे लागले व पुढील प्रवास मोटारीने करावा लागताे.