खेडमध्ये सदनिकेला आग लागून लाखोंची हानी, आगीचे कारण अज्ञातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:59 IST2020-12-12T21:57:12+5:302020-12-12T21:59:02+5:30
Khed, Fire, Ratnagirinews खेड शहरातील शिवतर रोड येथील नाडकर आर्केड या अपार्टमेंटमधील एका सदनिकेत सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

खेडमध्ये सदनिकेला आग लागून लाखोंची हानी, आगीचे कारण अज्ञातच
खेड : शहरातील शिवतर रोड येथील नाडकर आर्केड या अपार्टमेंटमधील एका सदनिकेत सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. प्रसंगावधानामुळे मोठी जीवित हानी टाळली. मात्र, सदनिकेला आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, खेड शहरातील शिवतर रोड येथील नाडकर आर्केड या अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील अक्षय खेडेकर यांच्या सदनिका नंबर १०३ मध्ये सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, कपडे, भांडी, फर्निचर इत्यादी सर्व प्रकारच्या वस्तू आगीत जळून राखरांगोळी झाली होती. या आगीची माहिती नगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नगर पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी भीषण आग आटोक्यात आणली. सदनिकेला आग लागल्याने आजुबाजुचे इतर सदनिका धारक धास्तावले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारच्या अनेक लोकांनी मोठी मदत केली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.