Maratha Kranti Morcha :आरक्षण द्या, नाहीतर सुव्यवस्था बिघडेल, राजापूरच्या नायब तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:43 IST2018-07-27T14:40:30+5:302018-07-27T14:43:29+5:30
शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले.

Maratha Kranti Morcha :आरक्षण द्या, नाहीतर सुव्यवस्था बिघडेल, राजापूरच्या नायब तहसीलदारांना निवेदन
राजापूर : मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत असताना मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांचे शासन कमालीचे उदासिन असून, शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा मराठा समाज गप्प बसणार नाही. यापुढे होणाऱ्या आंदोलनांदरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा सेवा संघातर्फे प्रभारी नायब तहसीलदार शेळके यांना देण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणावरून सध्या जोरदार आंदोलने सुरु असून, शासनाने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यात जोरदार आंदोलने सुरु आहेत. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी निदर्शने झाली. आरक्षण मागणीसाठी निवेदने सादर करण्यात आली आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक मूक मोर्चे काढून सनदशीर मार्गाने शासनाकडे मागणी केली होती. पण, शासनासह मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत उदासिनता दाखविली. परळी (बीड) येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी मेगा भरतीबाबत केलेल्या विधानामुळे मराठा तरुण दुखावला गेला असून, नैराश्य भावनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली होती. त्याला शासन जबाबदार आहे, असा आरोप देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाने आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करताना योग्य भूमिका घेतली गेली नाही तर आमच्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार प्रयत्न करु, त्यावेळी शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असा इशारा त्या निवेदनात देण्यात आला आहे.