जनकल्याण समितीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:52 IST2020-04-15T13:50:50+5:302020-04-15T13:52:12+5:30
कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

जनकल्याण समितीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा
राजापूर : लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका छोट्या आंबा बागायतदारांना बसला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचाकडील आंबा विकत घेतला आहे.
यावर्षी अवकाळी पाऊस व वादळामुळे कोकणातील आंबा बागायतदार चांगलाच मेटाकुटीला आला होता. त्यात आधीच आंबा बागायतदारांचे खूप नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून सुटका होतानाच संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट उभे राहिले आहे. अवकाळी पाउस व वादळ यातून वाचलेला थोडाफार आंबा तयार होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव सुरु झाल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे एकतर बाजारपेठा बंद झाल्या आणि झाडावर तयार होणारा आंबा काढण्यासाठी कामगारही मिळत नाहीत, अशी स्थिती ओढवली आहे.
ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने आंबा वाहतूकीसाठी परवाने द्यायला सुरुवात केली. मात्र छोट्या बागायतदारांकडील आंबा कोणी उचलायला पुढे येत नव्हते. त्यामुळे राजापूर तालुक्यातील छोटे आंबा बागायतदार अधिक चिंतेत होते. त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचा आंबा खरेदी करण्याची तयारी दर्शवत हा आंबा बाजारात ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.
तालुक्यातील छोट्या आंबा बागायतदारांकडील आंबा खरेदी करून पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी भागामध्ये दलालांची साखळी न वापरता विक्रीसाठी आणला आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.