आंबा बागायतदार धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:49+5:302021-03-20T04:30:49+5:30
रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यात दि.२१ व २२ मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला ...

आंबा बागायतदार धास्तावले
रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यात दि.२१ व २२ मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असून, वाराही सुटला आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता असल्याने, आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. या वर्षी एकूणच आंबा कमी असताना, अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे
मसापची साहित्य सभा
रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या रत्नागिरी शाखेच्या दुसरी साहित्य सभा येथील पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात झाली. संवादिनी वादक निरंजन गोडबोले यांच्या वादनाने झाली. त्यानंतर, रत्नागिरीतील सिद्धहस्त लेखक दीपक नागवेकर यांनी त्यांच्या सोनतळ या ललित लेख संग्रहातील लेखांचे वाचन केले.
बागायतदारांशी चर्चा
रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाशी सलग्न आंबा-काजू बागायतदारांची सभा पावस येथे माजी चेअरमन व माजी आमदार बाळ माने यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला पावस, नाखरे, निरूळ, गणेश गुळे, कुर्धे परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या भात खरेदी योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
सभागृहाचे आज उद्घाटन
रत्नागिरी : शहरातील कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सभागृहाचे उद्घाटन व नामकरण सोहळा शनिवार, दि. २० मार्च रोजी हाेणार आहे. या समारंभात कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन केले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. रविवार दि. २१ रोजी दुपारी ३.३० वाजता संघाची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा याच वास्तूत: होणार आहे.
कीड व्यवस्थापनाचे आवाहन
रत्नागिरी : नारळ पिकावर रूगोज चक्राकार माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कीड नारळाबरोबर अन्य पिकांवरही आढळू लागली आहे. थंडीचा प्रादुर्भाव कमी अधिक झाला की, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. बदलत्या हवामानानुसार, एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याचे आवाहन भाट्ये नारळ संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. रूगोज चक्राकार पांढरी माशी ही रस शोषण करणारी कीड आहे.
फळबाग लागवड
रत्नागिरी: जिल्ह्यामध्ये मनरेगातंर्गत या वर्षी साडेतीन हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, आंबा, काजू, नारळ ही महत्त्वपूर्ण पिके घेतली जात आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण फलोत्पादनाखाली १,७५,३०५ हेक्टर क्षेत्र असून, आंबा पिकाचे ६६,४३३, काजू १,०२,४००, नारळाचे ५,२१२ हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित क्षेत्रावर चिकू व अन्य फळपीक घेतले जात आहे.
प्रियांका देसाई यांचा सत्कार
गुहागर : तालुक्यातील पाटगाव केंद्र शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रियंका नंदकुमार देसाई नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने, त्यांचा केंद्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख महावीर कांबळे, पदवीधर शिक्षक अमर पवार, ऋतुजा कदम, सचिन खरात उपस्थित होते.
महिला मेळावा उत्साहात
देवरूख : महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संगमेश्वर तालुका शाखा कार्यालयातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्राजक्ता यशवंतराव यांनी भूषविले. प्रमुख वक्त्या म्हणून पूनम चव्हाण उपस्थित होत्या. प्रास्ताविक मनाली कनावजे यांनी केले. दीपाली बावधने हिने वकिलीची सनद मिळविल्याबद्दल, तसेच वेदांती राव, रेश्मा दळवी, ॲड.पूनम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
जगताप यांची नियुक्ती
देवरूख : देवरूख पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपद मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निशा जाधव यांची खेड येथे बदली झाल्याने रिक्त पदावर जगताप यांची नियुक्ती झाली आहे. उपनिरीक्षक पदापासून त्यांनी आपल्या नोकरीस प्रारंभ केला. अमरावती, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी सेवा बजावली होती.