तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाई शासनदरबारी
By Admin | Updated: April 13, 2017 13:52 IST2017-04-13T13:52:57+5:302017-04-13T13:52:57+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने रक्कम गेली परत

तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाई शासनदरबारी
आॅनलाईन लोकमत
राजापूर (जि. रत्नागिरी), दि. १३ : जनतेकडुन सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सलग दुसऱ्या वषीर्ही सुमारे तेरा कोटीच्या आसपास आंबा नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडे वर्ग झाली आहे. गतवर्षी देखील अशाच पध्दतीने रक्कम परत गेली होती.
तालुक्यातील समस्त आंबा बागायतदार शेतकर्यांसाठी ११ कोटी ३५ लाख रुपये नुकसान भरपाई पोटी तालुक्याला आले होते. त्यानंतर आणखी पाच कोटी आले अशी एकत्रीत १६ कोटी ३५ लाख रुपये तालुका प्रशासनाकडे जमा झाले होते. त्यानंतर शासनाकडुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवान्ना आपापल्या भरपाईचे धनादेश घेऊन जाण्याबाबत शासकीय पातळीवरुन आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आंबा बागायतदार शेतकरी यांनी आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता करुन शासनाकडुनभरपाई स्वीकारली पण त्याचे प्रमाण फारच कमी होते.
या कालावधीच केवळ साडेतीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे अनुदानाचे वाटप करण्यात आले. तथापी ज्या प्रमाणात हे वाटप व्हायला हवे होते ते झाले नाही. सलग दुसऱ्या वषीर्ही वाटप न झालेली भरपाईची रक्कम पुन्हा शासनाकडे वर्ग झाली आहे.
सुमारे तेरा कोटीच्या आसपास रक्कम असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. किचकट प्रक्रिया व कागदपत्रे गोळा करताना येणाऱ्या अडचणी अशी विविध कारणे जनतेच्या उदासीनतेमागील असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मागील वेळीदेखील काही कोटीची अनुदानाची रक्कम मुदतीत वितरण न झाल्याने शासनाकडे वर्ग झाली होती. यावेळीही तोच अनुभव पुन्हा आला आहे. (प्रतिनिधी)