मंडणगड-दापोली एसटी बसवर दगडफेक, चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 14:12 IST2022-01-04T14:11:51+5:302022-01-04T14:12:16+5:30
दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली.

मंडणगड-दापोली एसटी बसवर दगडफेक, चालक जखमी
दापोली : दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दगडफेकीत चालक अनंत दयाळकर यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तर, बसचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.
दापोली पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली आगारामधील चालक अनंत दयाळकर हे आपल्या ताब्यातील बस घेऊन रविवारी, २ जानेवारी रोजी मंडणगड वरून दापोलीकडे येत होते. संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास ते पालगड या ठिकाणी बस घेऊन आले. त्यावेळी पालगड जोशी बंगल्याच्या पुढे अज्ञात दुचास्कीस्वाराने चालत्या बस वर अंधारातून दगड भिरकावले.
या दगडफेकीत बसची समोरील काच फुटली. काच फुटून तो दगड चालक अनंत दयाळकर यांच्या पायावर लागल्याने त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात अज्ञाता विरुद्ध भा.दं. वि. कलम ४२७, ३३७ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार मिलिंद चव्हाण करीत आहेत.